रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार, म्हणूनच खड्डे!
अरविंद केजरीवाल यांची टीका : पणजीतील लोकांशी साधला संवाद,मुख्यमंत्री डॉ.सावंत यांना निवेदन
पणजी : गेल्या तीन दिवसांपासून आपण गोवा दौऱ्यावर असून, अनेक लोकांच्या भेटी घेतल्या. अनेक रस्त्यांवरून प्रवास केला. या दरम्यान राज्यातील रस्त्यांची वाताहत झाल्याचे दृष्टीस पडले. राज्यातील रस्ते हे जीवघेणे आहेत. डांबरीकरण केलेले रस्ते जर तीन महिन्यांत खराब होत असतील, तर यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसते. हा भ्रष्टाचार थांबवून जनतेला चांगले खड्डेविरहीत रस्ते भाजप सरकारने द्यावेत, अशी मागणी आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख नेते तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. पणजी येथील आपच्या कार्यालयाजवळ केजरीवाल यांनी लोकांशी संवाद साधत आपतर्फे भाजपविरोधात राबविण्यात आलेल्या ‘बुराक मोहिमे’त सहभाग घेतला.
यावेळी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी, आमदार वेन्झी व्हिएगस, आमदार क्रुझ सिल्वा, आपचे नेते अमित पालेकर आदी उपस्थित होते. केजरीवाल म्हणाले, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. यामुळे अनेक लोकांचा जीव गेल्याचे विधानसभा अधिवेशनकाळात मान्य केलेले आहे. परंतु रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे का होत आहे, याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळेच आज रस्ता कामात भ्रष्टाचार वाढलेला आहे. यावर अंकुश ठेवायचा असेल तर आता लोकांनाच याविऊद्ध आवाज उठविण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. आपने पणजी तसेच पर्वरी येथील मंत्रालय परिसरात भाजपविऊद्ध ‘बुराक मोहीम’ राबवली. या मोहिमेचा भाग म्हणून आपच्या कार्यकर्त्यांनी पणजीतील आपचे कार्यालय ते पर्वरी मंत्रालय या दरम्यान भाजपविऊद्ध ‘बुराक मोहीम’ रॅली काढली. या रॅलीत अरविंद केजरीवाल यांनीही सहभाग घेतला. तसेच राज्यातील विविध ठिकाणाहून लोक सहभागी झाले होते.
‘आप’च्या कार्यकर्त्यांना धमक्या
भाजप सरकारच्या रस्त्यांच्या कामाविऊद्ध आपतर्फे राज्यभरात सह्यांची मोहीम राबविण्यात आली होती. या दरम्यान आपच्या कार्यकर्त्यांना या मोहिमेपासून काहींनी रोखण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्त्यांना धमकाविण्यातही आले. या गोष्टी करण्यापेक्षा राज्यातील भाजप सरकारने राज्यातील सर्व रस्ते निटनेटके करीत खड्डेमुक्त करण्याकडे लक्ष द्यावे, अशी सूचनाही अरविंद केजरीवाल यांनी केली. पर्वरी येथील मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच भाजपविऊद्धच्या ‘बुराक मोहिमे’ला पोलिसांनी अडवले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत गेलेले आपचे राज्यातील नेते अॅड. अमित पालेकर, आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस, क्रुझ सिल्वा, श्रीकृष्ण परब यांना पोलिसांनी रोखले. यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी सरकारविऊद्ध घोषणाबाजी केल्याने काही काळ वातावरण तंग बनले होते.
15 दिवसांत गोवा खड्डेमुक्त करू : मुख्यमंत्री
आम आदमी पक्षाने रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत व्यक्त केलेली चिंता रास्त आहे. त्यामुळे आपचे निवेदन स्वीकारले आहे. येत्या 15 दिवसांत राज्याला खड्डेमुक्त करू, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. लोकांना साधन-सुविधा पुरविण्यात सरकार नेहमीच पुढे राहिलेले आहे. आता पावसाळा संपला असून, येत्या 15 दिवसांत राज्यातील खड्डे बुजविण्यात येतील.