For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अबकारी खात्यात अडीच हजार कोटींचा भ्रष्टाचार

06:30 AM Jan 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
अबकारी खात्यात अडीच हजार कोटींचा भ्रष्टाचार
Advertisement

भाजपचा गंभीर आरोप : मद्यविक्री परवान्यासाठी लाच मागण्यात येत असलेली कथित ध्वनिफीत उघड

Advertisement

प्रतिनिधी/बेंगळूर

अबकारी खात्यात सीएल-7 लायसन्स मंजूर करण्यासाठी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांच्यावतीने लाचेची मागणी केलेली कथित धक्कादायक ऑडिओ क्लिप भाजपने उघड केली आहे. अबकारी खात्यात अडीच हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. हा पैसा निवडणुकीसाठी वापरला जात आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केला असून आर. बी. तिम्मापूर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

Advertisement

रविवारी बेंगळूरमधील भाजप कार्यालयात विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक, विधानपरिषदेतील विरोधी नेते चलवादी नारायणस्वामी, विरोधी पक्षाचे मुख्य प्रतोद एम. रवीकुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांच्यावतीने अधिकाऱ्यांमार्फत लाच मागितल्याची कथित ध्वनिफीत यावेळी उघड करण्यात आली. 1 मिनिट 12 सेकंदाचे संभाषण असणाऱ्या ध्वनिफितीमध्ये अबकारी डीसी जगदीश, अधीक्षक तम्मण्णा, आणि कॉन्स्टेबल लक्कप्पा गणी यांचे संभाषण आहे. आर. बी. तिम्मापूर यांना किती रक्कम द्यावी, कोणत्या कारणास्तव परवाना देण्यास विलंब होतो, याचा उल्लेख त्यात आहे.

सरकारकडून गांधीजींची तत्त्वे नष्ट करण्याचा प्रयत्न!

याविषयी पत्रकार परिषदेत बोलताना आर. अशोक म्हणाले, राज्य सरकार विविध खात्यांना उत्पन्नाचे टार्गेट देत आहे. परंतु, अबकारी खात्यात परवान्यांचा लिलाव केला जातो, अबकारी डीसी जगदीश नायक यांना 25 लाख रुपयांची लाच घेताना लोकायुक्त पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. याला थेट मुख्यमंत्री सिद्धरामय्या जबाबदार आहेत. काँग्रेस नेते व्हीबी-जी राम जी योजनेला विरोध करण्यासाठी महात्मा गांधीजींच्या नावाचा वापर करून अधिवेशन भरवत आहे. मात्र, याच पक्षाच्या सरकारने संपूर्ण राज्याला नशेत बुडवून गांधीजींची तत्त्वे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. अबकारी खात्यातील भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर मंत्री आर. बी. तिम्मापूर यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा मुख्यमंत्रीच कारणीभूत असल्याचे समजावे लागेल, अशा टिप्पणी त्यांनी केली.

आणखी कोणते पुरावे हवेत?

अबकारी परवाना सीएल-7 साठी 1.25 कोटी रुपयांची लाच निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच 750 परवाने देण्यासाठी 1,225 कोटी रुपये लाच म्हणून घेतले जातात. सीएल-2 साठी दीड कोटी रु. लाच निश्चित करण्यात आली आहे. 650 परवान्यांसाठी 92 कोटी रुपये लाच म्हणून घेतले जातात. मिनी ब्रुअरी लायसन्ससाठी अडीच कोटी रु. घेतले जातात. एकूण 2,500 कोटी रु. लाच म्हणून स्वीकारले जात आहेत. ही रक्कम आसाम विधानसभा निवडणुकीसाठी पाठवतात. यासंबंधीची ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे.  अबकारी डीसी जगदीश नायक, अधीक्षक तम्मण्णा, आणि कॉन्स्टेबल लक्कप्पा गणी हे आरोपी आहेत. तिघेही लोकायुक्त जाळ्यात अडकले आहेत. धनिफितीमध्ये मंत्र्यांना महिन्याला किती लाच द्यावे लागते? लाच न दिल्यास परवान्याला कसा विलंब होतो, याविषयी त्यांनी उघड केले आहे. यापेक्षा आणखी कोणते पुरावे हवेत, असा परखड प्रश्न आर. अशोक यांनी उपस्थित केला.

लाच म्हणून दिलेली रक्कम चार टेबलांकडे द्यावी लागते, असे अधिकाऱ्यांनीच म्हटले आहे. सर्वांना पैसे द्यावेत. पैसे लवकर दिले नर तत्काळ परवाना मिळतो, असेही अधिकाऱ्यांच्या संभाषणात उल्लेख आहे. त्यामुळे हे गांधींजींच्या विचारधारेवर चालणारे सरकार आहे का? असा टोला आर. अशोक यांनी लगावला.

मीठ खाल्लेल्यांना पाणी चाखावेच लागेल : सिद्धरामय्या

मीठ खाल्लेल्यांना पाणी चाखावेच लागेल. आम्ही कुणाचाही बचाव करणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे. मद्यविक्रीच्या परवान्यासाठी 25 लाखांची लाच घेताना बेंगळूरमधील अबकारी डीसी जगदीश नायक यांच्यासह तिघांना लोकायुक्त पोलिसांनी अटक केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली. भाजपने उघड केलेल्या ध्वनिफितीमध्ये मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख असल्याबद्दल मला माहीत नाही. भाजप सरकारच्या काळात 40 टक्के भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप मी केला नव्हता; कंत्राटदारांनी केला होता. अशा भाजप नेते माझ्यावर काय आरोप करतात?, असा टोला त्यांनी लगावला.

Advertisement
Tags :

.