kolhapur News | उदगाव पाणी योजनेतील भ्रष्टाचार,ठेकेदाराला काळ्या यादीत टाका ; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश
उदगाव ग्रामपंचायतीची कोल्हापूर सर्किट बेंचकडे धाव
उदगाव -उदगाव (ता.शिरोळ) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामात बोगस काम करून फसवणुक केली आहे. तसेच रेल्वे लाईन भरावाखाली लोखंडी पाईप ऐवजी पिवीसी पाईप टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब सरपंच सलीम पेंढारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दाखवून दिले आहे. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी उदगाव पाणी योजनेतील ठेकेदाराला काळ्या यादीत टाका व अंतिम बिल गोठवण्याचे आदेश दिले आहेत.
उदगाव येथे सन 2018 साली मंजुर झालेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून 6 कोटी 97 लाख रुपये निधीतून योजनेचे कामकाज करण्यात आले आहे. या योजनेत सुमारे 1.5 किलोमीटरची मुख्य पाईपलाईन जादाची कागदोपत्री दाखवून त्याची बिले काढण्यात आली आहेत. कोरे गल्लीत, धनगर गल्ली, कामाण्णा मळा याठिकाणी नव्याने पाईपलाईन घातली नाही. शिवाय पाईप घालण्याच्या पद्धतीत चूक केली आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आली आहे.
शिवाय करण्यात आलेल्या कामात मोठ्या प्रमाणात चूका दिसून आल्याने याप्रकरणी उदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सलीम पेंढारी, उपसरपंच अरुण कोळी, ॲड. स्वरूप शिंदे, आकाश कोळी यांनी कोल्हापूर सर्किट बेचमध्ये धाव घेऊन याचिका दाखल केली आहे.
पाचच दिवसापूर्वी रेल्वे भरावाखाली पाणी पुरवठा करणारी मुख्य लाईन लिकेज झाल्यानंतर याठिकाणीही बनावट पाईप घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या भरावाखाली पूर्णता लोखंडी पाईप घालण्याची तरतुद होती. मात्र ठेकेदाराने भरावाखाली पिव्हीसी पाईप घातली असून फक्त दिखाव्यासाठी लोखंडी पाईपचे तुकडे जोडण्यात आले आहेत. या गंभीर प्रकारानंतर ग्रामपंचायत व नागरिकांनी जिल्हा परिषदेकडे धाव घेऊन ठेकेदाराने केलेल्या गलथान कारभारा बदल रोष व्यक्त केला
अखेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस. यांनी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याबरोबर फौजदारी गुन्हा का दाखल करू नये? याचा खुलासा ७ दिवसाच्या आत करावा, असे आदेश पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याने देण्यात आले आहेत. तसेच या योजनेची फेर चौकशी करावी व चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारची बिले देऊ नयेत असे आदेश देण्यात आले आहेत.