महानगरपालिकेतील भ्रष्टाचार त्वरित रोखा
विविध संघटनांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : महापालिकेतील भ्रष्टाचार त्वरित रोखावा, भूसंपादन प्रक्रिया राबविताना भरपाईची प्रक्रिया पारदर्शक व्हावी व जनतेच्या पैशाचा दुरुपयोग टाळावा यासह इतर मागण्यांसाठी बेळगावमधील विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शेकडोंच्या संख्येने बेळगावमधील नागरिक मोचात सहभागी झाले होते. सरदार्स मैदानापासून या मोर्चाला सुरुवात झाली. महापालिकेमध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणे वरचेवर उघड होत आहेत. स्मार्ट सिटी निधीचाही अनेक ठिकाणी दुरुपयोग झाला आहे.
त्यामुळे जनतेच्या पैशाचा हा दुरुपयोग असून याचा तपशील द्यावा, अशी मागणी करण्यात आली. शहरातील स्मार्ट सिटीची कामे निकृष्ट झाल्याच्या तक्रारी नागरिकांकडून दाखल केल्या जात आहेत. त्यामुळे या कामाचा दर्जा तपासण्यासह दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी करण्यात आली. मोर्चामध्ये म. ए. समिती, श्रीराम सेना हिंदुस्थान, म. ए. युवा समिती तसेच शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थान अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, रणजित चव्हाण-पाटील, राजू मरवे, नेताजी जाधव, संजय शिंदे, सुधा भातकांडे, सागर पाटील, कपिल भोसले, मनोहर हलगेकर, प्रशांत भातकांडे यासह इतर उपस्थित होते.