सिंधुदुर्ग सार्वजनिक बांधकाम खात्यात भ्रष्टाचाराचे अड्डे
सावंतवाडी | प्रतिनिधी
बांधकाम खात्याबद्दलची परशुराम उपरकरांची भूमिका योग्य - बबन साळगावकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याबद्दल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी घेतलेली भूमिका अत्यंत गंभीर आणि योग्य आहे. या भूमिकेचे समर्थन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे. त्यांच्या मते, सिंधुदुर्ग सार्वजनिक बांधकाम खाते म्हणजे खाबूचे देवचर बनले आहे आणि या खात्यात भ्रष्टाचाराचे अड्डे तयार झाले आहेत. जिल्ह्यातील रस्त्यांची स्थिती बिघडलेली आहे .आणि रस्त्यांच्या देखभालीसाठी येणारा निधी योग्य ठिकाणी पोहोचत नाही, असा आरोप साळगावकर यांनी केला आहे.परशुराम उपरकर यांनी या संदर्भात वेळोवेळी निवेदने दिली असली तरी, संबंधित मंत्र्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आंबोली घाट रस्ता वारंवार खराब होत असून, त्या रस्त्याचे पुनर्वसन किंवा देखभाल करण्याच्या दृष्टीने कोणतीही ठोस पावलं उचलली जात नाहीत, यामुळे अनेक अपघात घडले आहेत आणि या अपघातांमध्ये अनेक जीव गमावले गेले आहेत.सर्वाधिक काळजीची बाब म्हणजे, रस्त्याच्या दुरुस्तीचा आणि देखभालीचा मुद्दा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समोर आणला असला तरी, त्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही. यामुळे परशुराम उपरकर यांनी घेतलेली भूमिका योग्य असून, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी तिचं समर्थन केलं आहे.याप्रकारची स्थिती जर कायम राहिली, तर लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित मंत्र्यांनी याकडे लक्ष देणं अत्यावश्यक आहे, असं बबन साळगावकर यांचं मत आहे.