For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भ्रष्ट अधिकाऱ्यांना लोकायुक्तांचा दणका

06:55 AM Dec 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
भ्रष्ट अधिकाऱ्यांना लोकायुक्तांचा दणका
Advertisement

बागलकोट, विजापूर, कारवारसह अनेक जिल्ह्यात छापा : निवासासह कार्यालयांमध्ये शोधमोहीम

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

बागलकोट, विजापूर, कारवार आणि रायचूरसह राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये लोकायुक्त अधिकाऱ्यांनी मंगळवारी पहाटे एकाचवेळी भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांसह कार्यालयांवर छापे टाकून धक्का दिला. छापेमारीदरम्यान मोठ्या प्रमाणात मालमत्ता आढळून आली आहे. अनेक अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर हा छापा टाकण्यात आला. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांसह कार्यालयांमध्ये शोधमोहीम सुरू आहे.

Advertisement

बागलकोट जिल्हा पंचायत नियोजन संचालक आणि अधिकारी श्याम सुंदर कांबळे यांच्या बागलकोट आणि गदग जिल्ह्यातील नरगुंद येथील घरांवर छापे टाकून तपासणी करण्यात आली. याच जिल्ह्यातील बसवणबागेवाडी येथील कृषी विभागाचे साहाय्यक संचालक मल्लप्पा हनमंतप्पा यरझरी यांच्या घरावरही लोकायुक्तांनी छापे टाकले. कारवार जिल्ह्याच्या सिद्धापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी माऊती यशवंत माळी यांच्या निवासस्थानी छापे टाकून कागदपत्रांची झडती घेण्यात आली आहे.

रायचूर जिल्ह्याच्या सिंधनूर उपविभागातील ग्रामीण पाणीपुरवठा खात्याच्या एईई डी. विजयालक्ष्मी यांच्या घरासह पाच ठिकाणी लोकायुक्तांनी छापेमारी केली आहे. बेहिशेबी मालमत्तेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. शहरातील  आयडीएसएनटी लेआऊटमधील चार मजली घर आणि जवळच्या दुसऱ्या घरात कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. याशिवाय सिंधनूर कार्यालय, यादगीर येथील फार्महाऊस आणि जोळदडगीते येथील त्यांच्या बहिणीच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहेत.

यादगीरमधील 30 एकर जमीन, यादगीरमधील लेआऊट आणि चंद्रबांडाजवळील जमीन यासह अनेक ठिकाणी एईई डी. विजयालक्ष्मी यांनी मालमत्ता मिळवल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. रायचूर, कोप्पळ आणि बळ्ळारी जिल्ह्यातील लोकायुक्त पोलिसांनी घरावर छापा टाकण्यासाठी पाच पथके तयार केली होती.  डी. विजयालक्ष्मी यांची अजून दीड वर्षाची सेवा शिल्लक होती. त्यांनी सर्वाधिक काळ सेवा सिंधनूरमध्ये बजावली होती. रायचूर, बागलकोट, विजापूर आणि कारवारसह दहाहून अधिक ठिकाणी लोकायुक्त अधिकारी कागदपत्रे तपासत आहेत. रायचूर शहरातील सुमारे 4 ठिकाणी अधिकारी कारवाई करत आहेत.

सामान्यांचे पैसे लुटणाऱ्या आणि सार्वजनिक सेवेत असताना बेकायदेशीर मालमत्ता उभारणाऱ्यांवर लोकायुक्तांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या छाप्याची संपूर्ण माहिती आणि जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत लवकरच उपलब्ध होणार आहे.

Advertisement
Tags :

.