चुका दुरुस्त करत पुढे जाणे म्हणजे अभ्यास
अध्याय सातवा
वरेण्यराजाच्या विनंतीवरून बाप्पांनी मृत्युनंतर माणसाला कोणती गती कशी प्राप्त होते व त्याचे परिणाम कोणते होतात हे सविस्तर सांगितलं. मृत्यूनंतर शुक्लगतीने पुढे जाणारा सूर्यमार्गाने, म्हणजे उजेडाच्या मार्गाने जात असतो व विना अडथळा ब्रह्मलोकी जाऊन पोहोचतो. तर कृष्णमार्गाने पुढं जाणारा अंधाराच्या मार्गाने चाचपडत जात असल्याने तो चंद्रलोकी जाऊन पोहोचतो. इतर जीव जे दुष्कर्म करणारे असतात ते अधोगतीला जाऊन नीच योनीत जन्म घेतात. शुक्ल व कृष्ण मार्गाचा नियम उन्नत अवस्थेत पोहोचलेल्या माणसांसाठी आहे. त्यानं केलेल्या पुण्य कृत्याच्या हिशोबानुसार तो तेथील सुखे उपभोगतो व पुण्यसंचय संपला की, त्याचा पृथ्वीवर पुनर्जन्म होतो. त्याला त्याच्या उद्धाराची आणखी एक संधी प्राप्त होते.
इथं संधी म्हणायचं कारण म्हणजे त्याला ह्या जन्मी प्रारब्धानुसार म्हणजे पूर्वकर्मानुसार पार्श्वभूमी लाभत असली तरी नितिनियमानुसार वागून निरपेक्षतेनं कर्म करायचं की नाही हे ईश्वराने त्याच्या हातात ठेवलेलं असतं. त्यानुसार अनुकूल, प्रतिकूल परिस्थितीत जो त्याच्या सुनिश्चयावरून ढळत नाही त्याला पुनर्जन्मातील वर्तणुकीनुसार मृत्यूनंतर सूर्यमार्गाने जाऊन ब्रह्मलोकी पोहोचायची संधी मिळते.
ज्याला ही वस्तुस्थिती माहित नाही त्याला आपलं कल्याण कशात आहे हे लक्षात येत नाही पण ज्याला हे कळलेलं आहे त्यांनं मात्र जी परिस्थिती वाट्याला आलेली असेल ती स्वीकारून, येणाऱ्या प्रसंगात निर्धारपूर्वक नितीन्यायानुसार वागण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी संत साहित्याचा अभ्यास करावा म्हणजे तो कुठं चुकतोय हे त्याच्या लक्षात येतं आणि त्याच्या वागणुकीत तो आवश्यक ते बदल करू शकतो. संतांनी त्यांचे ग्रंथ लोककल्याणासाठीच लिहिलेले असतात. समाजाने स्वत:मध्ये सुधारणा करून घ्यावी आणि आत्मोद्धार करून घ्यावा एव्हढीच त्यांची इच्छा असते. चुकणे आणि त्या चुका दुरुस्त करत पुढे सरकणे ह्यालाच अध्यात्मात अभ्यास असे म्हणतात. त्यासाठी मागील श्लोकात बाप्पानी सांगितल्याप्रमाणे सर्वत्र समभावाची वर्तणूक ठेवायची आहे. समभावाची वर्तणूक ठेवायची म्हणजे ज्याच्यासाठी जे करणं आवश्यक आहे ते निरपेक्षतेनं करायचं आणि हे सर्व जग भासमान आहे हे लक्षात घेऊन वागायचं. श्रीरामांची वर्तणूक अशीच होती म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणतात. अशी ज्याची वागणूक असेल त्याला सर्वत्र केवळ ब्रह्मच भरून राहिलेलं आहे अशी अनुभूती येऊ लागेल.
पण अशी अनुभूती मिळवणारे लोक फार थोडे म्हणजे कीती तर लाखो करोडोमध्ये एखाद्यालाच सर्व ब्रह्मव्याप्त आहे अशी अनुभूती येते. असा एखादाच हरिचा लाल निघतो कारण मी म्हणजे हा देह आणि समोर दिसणारं जग खरं आहे ह्या खात्रीने माणसं वागत असतात पण प्रत्यक्षात हे सर्व नाशवंत असल्याने हा केवळ एक भास आहे, पाण्यावर काढलेली रांगोळी एखादी हलकीशी लाट आली तरी विस्कटून जाते किंवा एखाद्या फळ्यावर खडूनं काढलेलं चित्र जसं क्षणार्धात पुसून टाकता येतं तसं प्रलयकाली ह्या सगळ्याचा नाश होतो. हे विश्व जर नाशवंत आहे तर मग कायम टिकणारे काय आहे ह्या प्रश्नाचे उत्तर बाप्पा बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
क्षरं पञ्चात्मकं विद्धि तदन्तरक्षरं स्मृतम् ।
उभाभ्यां यदतिक्रान्तं शुद्धं विद्धि सनातनम् ।। 4 ।।
अर्थ- पंचभूतात्मक जे ते क्षर म्हणजे नाश पावणारे व त्याच्या आत असणारे ते अक्षर म्हणजे अविनाशी. या दोहोंच्याहि जे पलीकडचे ते शुद्ध व सनातन असते ते ब्रह्म होय.
क्रमश: