प्रशिक्षणासाठी नगरसेवक म्हैसूरला रवाना
तीन दिवस प्रशिक्षणाचे आयोजन
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेचे महापौर व उपमहापौरांसह सत्ताधारी आणि विरोधी गटातील काही नगरसेवक प्रशिक्षणासाठी गुरुवार दि. 7 रोजी सायंकाळी म्हैसूरला रवाना झाले. बुधवार दि. 8 पासून 10 पर्यंत तीन दिवस म्हैसूर येथे नगरसेवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आल्यानंतर नगरसेवकांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे कामकाज आणि शिष्टाचाराबाबत म्हैसूर येथे तीन दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून नगरसेवकांना प्रशिक्षणासाठी म्हैसूरला बोलाविण्याबाबत चर्चा सुरू होती. पण सदर प्रशिक्षणाची तारीख निश्चित झाली नव्हती. म्हैसूर येथे नगर स्थानिक स्वराज्य संस्था प्रशिक्षण केंद्र आहे.
त्याठिकाणी नगरसेवकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. नगर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवे लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आल्यानंतर या केंद्रातर्फे नूतन नगरसेवकांना प्रशिक्षण दिले जाते. बेळगावात फेब्रुवारी 2023 मध्ये नवे लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आले. पण नगरसेवकांना प्रशिक्षण दिले नव्हते. आता तब्बल दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. 8 पासून शुक्रवार दि. 10 पर्यंत तीन दिवस चालणाऱ्या प्रशिक्षणात भाग घेऊ इच्छिणाऱ्या नगरसेवकांनी नावनोंदणी करण्यासह आधारकार्डची प्रत द्यावी, असा मॅसेज नगरसेवकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मनपाकडून पाठविला होता. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी महापौर, उपमहापौरांसह सत्ताधारी आणि विरोधी गटातील काही नगरसेवक रेल्वेने म्हैसूरला रवाना झाले.