स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी नगरसेवकाचे आंदोलन
महानगरपालिका प्रवेशद्वाराची स्वच्छता करून वेधले लक्ष
बेळगाव : स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला भत्ता देण्याच्या सूचना राज्य सरकारने करूनही बेळगावमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांना मागील वीस महिन्यांपासून भत्ता मिळालेला नाही. याविरोधात सरकारनियुक्त नगरसेवक दिनेश नाशीपुडी यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडत सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर फरशी पुसून स्वच्छता कर्मचाऱ्यांना न्याय द्या, अशी मागणी केली.
बेळगाव महानगरपालिका हद्दीत अंदाजे 631 स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत. 2023 मध्ये राज्य सरकारने प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याला 2 हजार रुपये भत्ता देण्याच्या सूचना केल्या होत्या. अध्यादेश येऊन वीस महिने उलटले तरी अद्याप भत्ते देण्यात आलेले नाहीत. यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याचे अंदाजे 40 हजार रुपयांचे नुकसान महापालिकेच्या चुकीमुळे झाले आहे. ही बाब नूतन आयुक्त शुभा बी. यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी कार्यवाही सुरू केली. परंतु, कनिष्ठ कर्मचारी स्वच्छता कर्मचाऱ्यांना भत्ते मिळवून देण्यास असमर्थता दर्शवित आहेत.
सरकारकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना अंदाजे 2 कोटी 54 लाख रुपये येणे बाकी आहेत. मनपाकडून राज्य सरकारला शिफारस केल्यानंतरच हा निधी मिळणार आहे. परंतु, अधिकारी काम करत नसल्याने नगरसेवक नाशीपुडी यांनी शुक्रवारी महापालिकेत प्रवेशद्वारानजीकची फरशी पुसून आंदोलन केले. यापूर्वीही त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करून समस्यांची जाणीव करून दिली आहे.
...तोवर आंदोलन सुरूच ठेवणार
स्वच्छता कर्मचारी शहर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्वाचे काम करतात. परंतु, त्यांना अद्याप भत्ता मिळालेला नाही. याला सर्वस्वी महापालिकेचे अधिकारी जबाबदार असून जोवर कर्मचाऱ्यांना भत्ता मिळणार नाही, तोवर हे आंदोलन सुरूच ठेवले जाणार आहे. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात, त्यानंतर त्यांच्या घरासमोरील कचरा गोळा करून आंदोलन केले जाणार आहे.
- दिनेश नाशीपुडी, नगरसेवक