‘त्या’ नगरसेवकाची महसूल अधिकाऱ्यांवर दादागिरी
महापालिका आवारात गोंधळाचे वातावरण : महसूल उपायुक्तांच्या मध्यस्थीनंतर वादावर पडदा
बेळगाव : मनपाच्या जन्म व मृत्यू दाखले विभागातून परस्पर फाईल उचलणाऱ्या ‘त्या’ नगरसेवकाने बुधवारी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत पुन्हा आगळीक करण्याचा प्रयत्न केला. इमारतींना पीआयडी क्रमांक देण्यावरून महसूल अधिकारी जगदीश अनिशेट्टर यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करण्यासह अर्वाच्च शब्दात शिवीगाळ केली. त्यामुळे महापालिका आवारात काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. विरोधी गटातील एका नगरसेवकाची वागणूक गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत वादग्रस्त ठरू लागली आहे. अधिकाऱ्यांना अनधिकृतपणे कामे करून देण्यासंदर्भात ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अलीकडेच त्या नगरसेवकाने जन्म-मृत्यू दाखले विभागातून एक फाईल परस्पर उचलली असल्याने सध्या तो नगरसेवक चर्चेत आहे. याबाबत आरोग्य विभागाचे अधिकारी त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते. त्यातच बुधवारी नगरसेवकाचे आणखी एक नवीन प्रकरण पुढे आले आहे. महापालिकेत सध्या ए आणि बी खात्यांतर्गत मिळकतींची नोंद करून घेतली जात आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेवर नोडल अधिकारी म्हणून महसूल अधिकारी जगदीश अनिशेट्टर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी त्या नगरसेवकाने महसूल अधिकारी अनिशेट्टर यांची भेट घेऊन तीन इमारतींना पीआयडी क्रमांक देण्याची मागणी करत कागदपत्रे दिली होती.
त्यावर कागदपत्रांची शहानिशा करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन अनिशेट्टर यांनी दिले. मात्र, बुधवारी सकाळपासूनच नगरसेवकाने अनिशेट्टर यांना फोन करण्यास सुरुवात केली. अधिकारी ए व बी खात्यांच्या नोंदणीत व्यस्त होते. त्यामुळे त्यांनी नगरसेवकाचा फोन घेतला नाही. शेवटी 20 हून अधिकवेळा सातत्याने फोन केल्याने अनिशेट्टर यांनी त्या नगरसेवकाचा फोन उचलून आपण कामात व्यस्त आहे. थोड्या उशिराने बोलतो, असे सांगून फोन बंद केला. त्यानंतर काहीवेळाने नगरसेवक आरडाओरड करतच महापालिकेत दाखल झाला. महसूल अधिकारी अनिशेट्टर यांना अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करण्यासह अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापालिका आवारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हा प्रकार लक्षात येताच त्या ठिकाणी असलेले सरकारनियुक्त सदस्य दिनेश नाशीपुडी व इतरांनी मध्यस्थी करून वादावर पडदा पाडला. महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी या देखील त्या ठिकाणी दाखल झाल्या. त्यांनी कागदपत्रांची पाहणी केली आणि कमी असलेली कागदपत्रे संबंधित नगरसेवकाला देण्यास सांगितल्यानंतर वादावर पडदा पडला.