ईडीसीचा आदर्श महामंडळांनी घ्यावा!
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन : सुवर्ण महोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
पणजी : गोव्याच्या आर्थिक क्षेत्रात ईडीसी अर्थात आर्थिक विकास महामंडळाची अत्यंत महत्त्वाची भूमिका ठरलेली आहे. ईडीसी हे गोव्याचे एकमेव महामंडळ जे नफ्यात चाललेय आणि हे महामंडळ वार्षिक सरकारला लाभांश देत असते. या महामंडळाचा आदर्श राज्यातील इतर सर्व महामंडळांनी घ्यावा, अशा शब्दात महामंडळाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ईडीसीला गौरविले आहे. ईडीसी आज 50 वर्षे पूर्ण करीत आहे. या निमित्ताने पूर्वसंध्येला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, ईडीसी महामंडळ 50 वर्षांपूर्वी गोवा सरकारने सुरू करण्याचा जो काही निर्णय घेतला होता तो योग्य होता. खऱ्या अर्थाने राज्याच्या आर्थिक क्षेत्रात या महामंडळाने आपले उद्दिष्ट साध्य केले आहे. महामंडळाचा उद्देश सर्व कर्मचारी, अधिकारी, व्यवस्थापकीय संचालकांनी तसेच संचालक मंडळांनी व आतापर्यंत झालेल्या सर्व चेअरमननी साध्य करुन दाखविला आहे. आपण त्या सर्वांचे कौतुकही करतो व अभिनंदनही करतो.
ईडीसी गोव्यासाठी भूषण
आज वेळोवेळी या महामंडळाने सरकारच्या इतर महामंडळाना देखील आर्थिक सहकार्य केलेले आहे. गोवा सरकारच्या काही योजना देखील या महामंडळाने उत्तमरित्या चालविल्या आहे. छोट्या छोट्या होतकरु तरुणांना उद्योजक, उद्योगपती बनविले. आज या महामंडळाने जी काही नेत्रदीपक प्रगती केलेली आहे ते पाहता हे महामंडळ गोव्यासाठी भूषण ठरलेले आहे.
लाभांश देणारे एकमेव महामंडळ
आज 50 वर्षे पूर्ण करीत असलेल्या या महामंडळाचे अध्यक्षपद आपण भूषवितोय. आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. महामंडळ कसे चालवावे याचा आदर्श ईडीसीने गोव्यात घालून दिलेला आहे. दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर गोवा सरकारला न चुकता लाभांश मिळवून देणारे हे गोव्यातील एकमेव महामंडळ आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
अत्यंत स्वच्छ कारभार
महामंडळाच्या कारभाराबद्दल आपल्याला नेहमीच कुतूहलता वाटली. अत्यंत शिस्तबद्धरित्या या महामंडळाचा प्रत्येक कर्मचारी सेवा बजावतोय आणि नव्याने उद्योग क्षेत्रात येणाऱ्यांना वा टॅक्सी खरेदी करणाऱ्यांना प्रशिक्षण देऊन कर्ज वितरण करते. याचबरोबर चांगल्या प्रमाणात कर्जाची वसुलीही केली जातेय. अत्यंत स्वच्छ कारभार या महामंडळाचा चालू आहे. आपण महामंडळाच्या सर्व संबंधितांना तसेच सर्व माजी अध्यक्ष व माजी संचालकांनाही शुभेच्छा देतोय, शिवाय त्यांचे आभारही मानतो, असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.
स्वयंरोजगारासाठी आदर्शवत प्रोत्साहन
स्वयंरोजगारासाठी या महामंडळाने केलेले प्रयत्न व दिलेले प्रोत्साहन हे पाहता सर्वच महामंडळांसाठी ईडीसी हा एक आदर्श आहे. इतर महामंडळांनी ईडीसीकडून भरपूर काही शिकावे असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. ईडीसीमुळे उद्योगपती तयार झाले व त्यांनी हजारो जणांना रोजगार संधी प्राप्त करुन दिल्या.
आज सायंकाळी पणजीत विशेष सोहळा
ईडीसीच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे हजर राहाणार आहेत. पणजीत आज दि. 12 रोजी हॉटेल फिदाल्गोमध्ये सायंकाळी 7.30 वा. हा सोहळा आयोजित केला आहे.