For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोरोनाची ‘काळजी’

06:40 AM Dec 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
कोरोनाची ‘काळजी’
Advertisement

केरळ, कर्नाटक, झारखंडनंतर महाराष्ट्रातही ‘जेएन-वन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने शिरकाव केल्याचे दिसत आहे. विषाणूचा नवा प्रकार आणि वाढती रुग्णसंख्या पाहता याबाबत काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. त्या दृष्टीकोनातून केंद्र सरकारनेही आवश्यक पावले टाकली असून, नागरिकांनीही घाबरून न जाता योग्य ती दक्षता घेतली पाहिजे. 2020 व 2021 या दीड ते दोन वर्षांच्या कालावधीत अवघ्या जगाने कोरोनाची भयावहकता अनुभवली. जगात वर्षा-सव्वा वर्षातच या आजाराने 40 लाख लोकांचा बळी गेल्याची आकडेवारी सांगते. तर मार्च 2020 ते मार्च 2021 या कालावधीत जवळपास पावणे दोन लाख नागरिकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात ही आकडेवारी याहून अधिक असल्याचे बोलले जाते. या साऱ्या कटू आठवणी मागे सारत व कोरोनाच्या वेगवेगळ्या लाटा, विषाणूचे नवनवीन प्रकार याच्याशी लढत-झुंजत काळ पुढे सरकला आहे. दरम्यानच्या काळात रशिया युक्रेन युद्ध, इस्राईल-पॅलेस्टाईनच्या संघर्षाच्या झळा जगातील विविध देशांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सोसाव्या लागल्या. महागाई, बेरोजगारी, दारिद्र्यासह अनेकविध आव्हानांशी तर भारतासह जवळपास सर्वच देशांना रोज दोन हात करावे लागत आहेत. किंबहुना, आपल्या दैनंदिन लढायांमध्ये सबंध जग व्यस्त असताना कोरोनाच्या नव्या उपप्रकाराने पुन्हा दार ठोठावल्याचे पहायला मिळते. चीन, ब्राझील, जर्मनी, सिंगापूर, अमेरिकेत कोरोनाबाधित ऊणांच्या संख्येत मोठी वाढ होत असतानाच आता भारतात या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. केरळ, कर्नाटक, झारखंड व महाराष्ट्रात प्रामुख्याने या आजाराचे रुग्ण दिसतात. देशातील कोरोना ऊग्णांची संख्या बुधवारअखेरपर्यंत 2311 वर पोहोचली असून, पुढच्या टप्प्यात ती आणखी वाढलेली असू शकते. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, ठाण्यासह सांगली, कोल्हापुरात आढळलेले रुग्ण पाहता सजगता बाळगणे आवश्यक ठरते. 2020 मध्ये कोरोनाची एन्ट्री झाली, तेव्हा हा आजार जगासाठी पूर्णपणे नवखा होता. आता तशी स्थिती राहिलेली नाही. वेगवेगळ्या व्हेरिएंटच्या फेऱ्यातून जाताना आपण बरेच काही शिकलो आहोत. त्यामुळे घाबरून न जाता शांतपणे या नव्या संकटाला कसे सामोरे जायचे, हे आता बऱ्यापैकी आपल्या सर्वांना कळून चुकले आहे. नव्या कोरोनाची लक्षणेही पहिलीसारखी सर्दी, ताप, थकवा, अंगदुखी खोकला केंद्रीत आहेत. त्यामुळे असा त्रास कुणाला झाला, तर त्याने अंगावर काढत बसू नये. तातडीने डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी व आवश्यकता असल्यास चाचणी करून घ्यावी. संरक्षण हा कोणत्याही त्रासावरचा सर्वोत्तम उपाय मानला जातो. त्यामुळे कोरोना काळातीलच गाईडलाईन प्रत्येकाने पाळल्यास बऱ्याच गोष्ट सुकर होऊ शकतात. स्वच्छता हा त्यादृष्टीने मूलमंत्र ठरावा. मास्क वापरणे, हे किती फायद्याचे आहे, हे कोरोना काळात आपण अनुभवले आहे. त्यामुळे मास्क वापरास प्रत्येकाने प्राधान्य द्यायला हवे. वारंवार हात स्वच्छ धुणे, सॅनिटाईजर बाळगणे, खोकताना व शिंकताना रुमाल वापरणे, या गोष्टीही प्रत्येकाने फॉलो करायला हव्यात. नाताळ सण तोंडावर आहे. हा काळही गर्दीचा मानला जातो. तथापि, गर्दीत जाणे शक्यतो टाळायला हवे. वृद्ध नागरिक, लहान मुले व सहव्याधी असलेल्या रुग्णांची तर विशेष काळजी घेतली पाहिजे. विलगीकरण ही तर सर्वांत महत्त्वाची गोष्ट होय. कोरोनाचा संसर्ग टाळायचा असेल, तर विलगीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यादृष्टीने संसर्ग झालेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी. बेंगळूरमध्ये कोरोनामुळे एका 64 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, या रुग्णास जेएनवन प्रकारचाच संसर्ग झाला होता का, यावर अद्याप प्रकाश पडू शकलेला नाही. तसेच त्याला इतरही आजार असल्याचे कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे लगेचच कोणता निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुखा मांडविया यांनीही नव्या कोरोनाच्या संसर्गामुळे घाबरून जाऊ नये, असे आवाहन नागरिकांना केले आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य व केंद्रशासित प्रदेशांनाही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. हे पाहता राज्यांना कोरोना चाचण्या वाढवाव्या लागतील. त्याचबरोबर बेड, ऑक्सिजन व तत्सम आरोग्य सुविधाही तैनात ठेवाव्या लागतील. कोरोना लाटेत काही खासगी ऊग्णालयांनी रुग्णांची प्रचंड लूट केली. लाखा-लाखांची बिले चुकवताना कुणाला सोन्यानाण्यासह घरातील मौल्यवान वस्तू विकाव्या लागल्या. तर कुणाला कर्ज काढावे लागले. यातून वाचलेल्या काहींना पुढे परत पोस्ट कोविडच्या वैद्यकीय खर्चाचा अधिभार सोसावा लागला. हे पाहता अशा ऊग्णालयांवर कुठेतरी अंकुश हवा. त्याचबरोबर सरकारी रुग्णालय व तेथील सेवा अधिक सक्षम व गतिमान करण्यावर भर असावा. अर्थात साथ नियंत्रणात ठेवण्यास सर्वात आधी प्राधान्य द्यायला हवे. जेणेकरून पुढची वेळ येणारच नाही. कोरोनाच्या ओमिक्रॉन या उपप्रकारानेही तसा बराच धूमाकूळ घातला होता. मात्र, त्याला काबूत ठेवण्यात आपली यंत्रणा यशस्वी ठरली होती. नवा विषाणूही वेगाने पसरणारा असला, तरी त्याची लक्षणे ही सौम्य प्रकारची आहेत. केरळमधील महिलेला काही दिवसांपूर्वी या विषाणूचा संसर्ग झाला होता. परंतु, ती आता ठणठणीत असून, या आजाराचा ऊग्ण आठभरात बरा होत असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हे बघता काळजी घेणे, हाच तुमचा आमचा सर्वांचा प्राधान्यक्रम असायला हवा. थंडीचा हंगाम हा तसाही सर्दी, खोकला व फ्लूसाठी अनुकूल मानला जातो. या काळात प्रदूषणाची पातळीही वाढत असल्याने अनेकांना व्हायरल इन्फेक्शनही होते. त्यामुळे लगेच भयभीत न होता डॉक्टरांकडे जावे. चांगला व पौष्टिक आहार, उकळलेले पाणी, व्यायाम, स्वच्छता याकडे प्रत्येकाने काटेकोर लक्ष द्यावे. काळजी घेतली, तर इतर व्हेरिएंटप्रमाणे जेएन-वनलाही आपण पुरून उरू, याचा प्रत्येकाने विश्वास बाळगावा.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.