मालवणमधील हॉटेल व्यवसायिकास ५० लाखांची कॉपीराईट नोटीस
मालवण । प्रतिनिधी
मालवण शहरातील एका हॉटेल व्यवसायिकास थेट ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई मागणारी कॉपीराईट नोटीस प्राप्त झाल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. हॉटेलमध्ये स्पिकरवर वाजवण्यात येणाऱ्या गाण्यांचे कॉपीराईट आमच्या कंपनीकडे असून परवानगीशिवाय गाणी लावल्याचा आरोप करत ही नोटीस पाठवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणाची माहिती नितीन वाळके यांनी पत्रकारांना दिली. संबंधित हॉटेल व्यवसायिकास काही दिवसांपूर्वी एक पत्र प्राप्त झाले होते. त्यामध्ये, फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेड, अंधेरी (मुंबई) या संस्थेकडे सदर गाण्यांचे कॉपीराईट असल्याचे नमूद करण्यात आले होते. कंपनीची परवानगी न घेता हॉटेलमध्ये गाणी लावल्याने कॉपीराईट नियमांचा भंग झाला असून, संबंधित व्यवसायिकावर कारवाई का करू नये, असा सवाल त्या पत्रात उपस्थित करण्यात आला होता.त्यानंतर काही दिवसांनी, एका महिला वकिलाच्या नावे नोटीस पाठवण्यात आली. या नोटीसमध्ये कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याबद्दल ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आल्याने संबंधित व्यवसायिक भयभीत झाला. त्याने तात्काळ आपल्या वकिलांचा सल्ला घेतला असून या प्रकाराबाबत जिल्हा व्यापारी महासंघाचे लक्ष वेधले आहे.या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा व्यापारी महासंघाने सदर प्रकार हा फसवणूक व आर्थिक लुबाडणुकीच्या उद्देशाने करण्यात आलेला असल्याचा आरोप केला आहे. या नोटीशीला कोणताही ठोस कायदेशीर आधार नसल्याचे सांगत, अशा नोटीशींना कोणत्याही प्रकारे उत्तर देऊ नये, असे आवाहन महासंघातर्फे करण्यात आले आहे.अशा नोटीसला प्रतिसाद दिल्यास मोबाईल नंबर हॅक करणे, ऑनलाइन माध्यमातून बँक खात्यातील रक्कम चोरणे असे प्रकार घडू शकतात, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. भविष्यात इतर कोणत्याही व्यापारी किंवा व्यावसायिकास अशा स्वरूपाच्या नोटीसा प्राप्त झाल्यास त्यांनी तात्काळ जिल्हा व्यापारी महासंघाशी संपर्क साधावा, असे आवाहन नितीन वाळके यांनी केले आहे.