प्रशासनाचा समन्वयच रोखेल वाहतुकीची कोंडी
विटा :
विट्याच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रशासनाने हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. मात्र पोलिस आणि नगरपालिका प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. केवळ समन्वयाअभावी नागरिकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. काही उपाययोजना तात्पुरत्या स्वरूपात तर काही उपाय हे तातडीने होणारे नाहीत. त्यासाठी आर्थिक नियोजन गरजेचे आहे. यासाठी प्रशासन आणि राजकारणी यांचा हातात असणे जसे गरजेचे आहे. प्रशासनाच्या सर्व विभागात समन्वय असणेही गरजेचे आहे. एकमेकांकडे बोट दाखवून समस्या सुटणार नाहीत तर वाढतच जाणार आहे.
- स्वयंशिस्त महत्त्वाची
वाहनधारकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. केवळ प्रशासनाकडे आणि राजकारण्यांकडे बोट दाखवत बेशिस्त वाहने पार्किंग आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यास त्याचा आपल्यात्च फटका बसण्याची शक्यता असते रस्त्यावर आपल्याच दुकानासमोर लोखंडाचे ग्रील टाकणे, वाहणे लावण्यास अडथळा करणे, यातून आपण काय साध्य करणार आहोत?, याचा विचार करणे गरजेचे आहे. बाजारपेठेचा विकास व्हायचा असेल तर अधिकाधीक लोक शहरात आले पाहिजेत.
लोक शहरात थांबायचे असतील तर त्यांच्या वाहनांना वाहनतळ आवश्यक आहे. लोक शहरात थांबलेच नाहीत तर बाजारपेठेवरही त्याचा परिणाम होणार आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे.
- प्रशासनाचा समन्वय साधण्यासाठी प्रयत्न
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि मुख्य चौकात चारही बाजूने येणाऱ्या वाहनांचे नियोजन योग्यरित्या होण्यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासनाचे प्रयत्न चालू आहेत. त्यामध्ये सिग्नल सुरू करणे, काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक सुरु करणे यांचा समावेश आहे. ऊस गाळप हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर्स, ट्रक ऐन गर्दीच्या वेळी चौकात येत होते. साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनासोबत बैठका घेऊन त्यांना वाहतुकीसाठी कमी गर्दीच्या वेळा ठरवून देण्यात आल्या. अपघात होऊ नये म्हणून या वाहनांना रिफ्लेक्टर्स बंधनकारक करण्यात आले. तसेच पंचायत समिती आणि बाजार समितीच्या जागेत पार्किंग सुविधा देण्याचा प्रयत्न केला.
प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल
- पे अॅण्ड पार्क करणे आवश्यक
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पार्किंगची समस्या सुटणे अत्यंत आवश्यक आहे. शहरात उपलब्ध असणाऱ्या जागेवर बेशिस्त पार्किंग होत असते. सकाळपासून त्या ठिकाणी वाहतुक पोलिस उभा करणे शक्य नाही. वाहतुकीचे नियमन करणे वाहतुक पोलिसांचे काम आहे. मात्र पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी नगरपालिकेने पे अॅण्ड पार्क करून पार्किंगला शिस्त लावणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा पंचमुखी गणपतीमागे आणि जुन्या नगरपालिकेसमोर असणाऱ्या पार्किंगच्या जागेत दिवसभर स्थानिक लोकांच्या गाड्या पार्क झालेल्या असतात. त्यांच्या अर्पाटमेंटमध्ये पार्किंगची जागा नसल्याने त्यांनी या जागा अडवल्या आहेत. परिणामी बाहेरून येणाऱ्या लोकांना गाडी लावण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. रस्ते दुभाजकांच्या बाबतीत नगरपालिकेला वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. मात्र नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे बोट दाखवत आहे. प्रत्यक्षात कारवाई काहीच होत नाही. केवळ वाहतुक पोलिसांना दोष देऊन चालणार नाही. आम्ही आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विपूल पाटील यांनी नगरपालिका प्रशासनाला खाऊगल्लीबाबत काही सुचना केल्या होत्या. मात्र त्यावर उपाययोजना झाली नाही. आम्ही वाहतूक कोंडी रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. मात्र त्याला प्रशासनानेही सहकार्य करणे अपेक्षित आहे.
- सचिन माळी, पोलीस उपनिरीक्षक वाहतूक शाखा
- रिंगरोड विकसीत करण्याचे आव्हान
विटा शहरातील पार्किंग समस्या अत्यंत महत्वाची आहे. शहराच्या मध्यभागातून जाणारे दोन महामार्ग, मोठी बाजारपेठ असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात ये जा असते. शहराचा विकास आराखडा मंजूर असून त्यात सपूर्ण शहराला रिंग रोड प्रस्तावित केला आहे. त्या रस्त्याचा विकास झाला तरी शहरातील मध्यभागी येणाऱ्या वाहतुकीचा ताण कमी होईल. रिंग रोडचे आरक्षण विकसित करण्यासाठी लागणारे खासगी जमिनीचे भू संपादन आणि त्याकरिता लागणारा खर्च याचे मोठे आव्हान आहे. शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणारे वाहनतळ विकसित करण्याचे नियोजन चालू आहे. तसेच बांधकाम परवानगी घेतल्यावर त्यामधील अटी आणि शर्ती प्रमाणे केले गेलेले काम याची काटेकोर तपासणी सुद्धा करीत आहोत. शहरातील लोकांच्या सहभागाने या समस्येवर मार्ग निश्चित काढता येईल.
- विक्रमसिंह पाटील, मुख्याधिकारी विटा नगरपालिका