For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बालकामगारांच्या संरक्षण-पुनर्वसनासाठी समन्वयाने काम करा

10:28 AM Jun 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
बालकामगारांच्या संरक्षण पुनर्वसनासाठी समन्वयाने काम करा
Advertisement

कार्यकारी समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यात बालकामगारांचे संरक्षण व त्यांच्या पुनर्वसनासाठी संबंधित सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा बाल कामगार योजनेच्या कार्यकारिणी समितीची बैठक झाली. या बैठकीच्या अध्यध्यपदावरून बोलताना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे अचानक भेटी देऊन बालकामगारांचे संरक्षण करावे. बालकामगार कायद्याची अंमलबजावणी, तपासणी, खटले दाखल करणे, दंडवसुली बरोबरच या कायद्यासंदर्भात जागृती करण्यासाठी ठिकठिकाणी भिंतीवर मजकूर लिहिण्यात यावा. अंगणवाड्या, शाळा-कॉलेज व सरकारी कार्यालयांच्या भिंतींवर मार्गदर्शनपर मजकूर लिहावा. बालकामगारांचे संरक्षण व पुनर्वसनाच्या अभियानाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 30 जूनपर्यंत पॅन इंडिया कार्यक्रम आयोजित करावा. बालकामगार प्रतिबंध व नियंत्रण कायद्यानुसार बाल कलाकारांसाठीही काही नियम आहेत.

याविषयी व्यापक जागृती करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. जिल्हा व तालुका पातळीवरील कार्यकारी समिती बदलण्यासाठीही जिल्हाधिकाऱ्यांनी अनुमोदन दिले. 12 जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिन कार्यक्रमाची तयारी करावी. त्याचदिवशी बालकामगारांच्या पुनर्वसनासंबंधीचे भरपाईचे धनादेश वाटप करावे, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना केली. काही सरकारी कार्यालये, इस्पितळे व कापड व्यवसायात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनात कपात केली जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. कंत्राटदारांनी वेतन कपात करू नये यासाठी कामगार खात्याच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक पावले उचलण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. जर किमान वेतन दिले नाही तर त्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. यावेळी बालकामगार योजना संचालक ज्योती कांते, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख श्रृती, जि. पं. चे मुख्य योजनाधिकारी गंगाधर दिवटर, कामगार खात्याचे साहाय्यक आयुक्त महमद बशीर अन्सारी, कामगार विभागाचे अधिकारी तरन्नूम, मल्लिकार्जुन जोगूर यांच्यासह विविध खात्यातील अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.