सहकारी संस्थांचा सोमवारपासून धुरळा
कोल्हापूर :
राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रीया 6 जानेवारीपासून सुरु करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे सोमवारपासुन जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. निवडणुक प्राधिकरणच्या आदेशामुळे जिल्ह्यातील निवडणुक प्रलंबित असलेल्या सुमारे 2500 हून अधिक सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यातील सुमारे 873 हुन अधिक सहकारी संस्था आणि सुमारे 1665 प्राथमिक दूध संस्था निवडणुकीच्या प्रतिक्षेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या संस्थांच्या निवडणुका 31 मे पर्यंत स्थगित केल्या होत्या. यानंतर 7 जून रोजी सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रीया सुरु करण्याचे आदेश प्राधिकरणचे सचिव यांनी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रीया सुरु करण्याच्या हालचाली जिल्हा उपनिबंधक आणि सहाय्यक दुग्ध निबंधक कार्यालयातून सुरु होत्या. मात्र तोच 20 जून रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने पावसाळी वातावरणामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्याचा आदेश दिला. सप्टेंबर महिन्यानंतर ऑक्टोबरमध्ये लगेचच राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली.
त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रीया ठप्प होती. मात्र गुरुवारी राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रीया सोमवार 6 जानेवारीपासून सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता संपूर्ण राज्याभर सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे.