For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जनतेचे सहकार्य, पक्षाचे आशीर्वाद, हीच माझी ऊर्जा!

01:15 PM Mar 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
जनतेचे सहकार्य  पक्षाचे आशीर्वाद  हीच माझी ऊर्जा
Advertisement

डॉ. प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रीपदाची सात वर्षे पूर्ण : गोव्याला कठीण परिस्थितीतून आर्थिक मजबूत बनविले

Advertisement

पणजी : राज्यातील जनतेने, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाने आणि त्याच्या नेत्यांनी आपल्यावर सात वर्षांपूर्वी जी जबाबदारी सोपविली ती पार पाडण्यात आपल्याला बऱ्या प्रमाणात यश प्राप्त झाले. अनेक विकासप्रकल्प गेल्या सात वर्षांमध्ये गोव्यात आणले. सातवेळी अर्थसंकल्प सादर केले. त्यातील पाचवेळी शिलकी अर्थसंकल्प सादर केले. ‘माझे घर’ सारखी योजना देशात प्रथमच आपण राबविली आणि तिला  जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. जनतेचे सहकार्य, पक्षाच्या नेत्यांचा आशीर्वाद यातून आपल्याला काम करण्याची ऊर्जा प्राप्त झाली. त्यामुळेच आपण या राज्यात असंख्य विकासकामे करू शकलो..! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाचा ताबा घेतल्यास आज सात वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने दैनिक तऊण भारतशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी अनेक विषयांवर संवाद साधला.

प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन नको

Advertisement

मुख्यमंत्री म्हणाले, आपण समाधानी आहे. जनतेमध्ये अलीकडच्या काही दिवसांमध्ये भीती निर्माण झालीय, कारण विकासाचा ओघ वाढला आणि भविष्याची त्यांना चिंता वाटली, परंतु प्रत्यक्षात कोणी घाबरून जाऊ नये. प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करण्याची जऊरी नाही.

जनतेच्या मतांचा आम्ही आदर करतो

हे सरकार जनतेसाठी काम करणारे आहे. आजपर्यंत जनकल्याणाच्या योजना आपल्या सरकारने राबविल्या. काही प्रकल्पांना विरोध असू शकतो, जनतेचे म्हणणे आम्ही कधी बाहेर फेकले नाही. उलट जनतेच्या मतांचा आम्ही आदर करतो.

‘अँटी इन्कमबन्सी फॅक्टर’ मुळीच नाही

अलीकडच्या काळातील आंदोलने म्हणजे सरकारच्या विरोधातील ‘अँटी इन्कमबन्सी फॅक्टर’ मुळीच म्हणता येणार नाही. जनतेच्या मनातील भीती आम्ही निश्चितच दूर करू, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींमुळे अनेक प्रकल्प पूर्ण

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी दिलेला पाठिंबा आणि त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळे जे अशक्य असलेले प्रकल्प देखील आम्ही पूर्ण करू शकलो. आज गोव्यामध्ये जे अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प आपल्या नजरेस येतात ते केवळ केंद्रातील भाजपच्या सरकारमुळे शक्य झाले. अनेक प्रकल्प गेल्या सात वर्षांमध्ये जे आपल्या सरकारने पूर्ण केले ही खरी तर आपली फार महत्त्वाची कामगिरी ठरलेली आहे.

गोव्याचा पहिला युवा मुख्यमंत्री हा मान

आपण गोव्याचा पहिला युवा मुख्यमंत्री हा मान देखील आपल्याला पक्षाने दिला. अत्यंत कठीण परिस्थितीतून आपण मार्गक्रमण करीत गेलो. एवढ्या कमी वयामध्ये आपण मुख्यमंत्री होईल, असा कदाचित विचार केला नव्हता. देवानेच आपल्याला ही संधी मिळून दिली आणि त्यातून आपण छोट्या छोट्या घटकापर्यंत जाऊन विकासाचे प्रकल्प पोचविले आणि त्यामुळे आपण समाधानी आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंडकार प्रश्न, पर्यावरण संतुलन महत्त्वाचे कार्य

मुंडकार कायद्यामध्ये केलेले बदल, त्यासाठीचे कायदे आपण विधानसभेत आणले. मुंडकारांना त्यांच्या घराचे कायदेशीर हक्क प्राप्त करून दिले. माझे घर ही एक देशातील फार मोठी योजना आहे. किनारपट्टी परिसरातील नियंत्रण, गोवा जैव वैविधता तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आपल्या सरकारने केलेले काम हे तेवढेच अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गोव्याची आर्थिक स्थिती बनवली मजबूत

सलग सातवेळा आपल्याला गोव्याचा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली आणि वित्तीय क्षेत्रात आपण फार मोठे कार्य केले. जेणेकरून गोव्याची आर्थिक स्थिती आज मजबूत अवस्थेत आणून ठेवलेली आहे. ओरिसानंतर आज जर कोणत्या राज्याचा क्रमांक लागत असेल तर तो आहे आमच्या गोव्याचा. नीती आयोगाने देखील गोव्याने आर्थिक क्षेत्रात केलेल्या प्रगतीबद्दल अत्यंत समाधान व्यक्त केले आहे. आमची आर्थिक स्थिती नाजूक होती, ती आज मजबूत करण्यासाठी आपण उचललेली पावले उपयोगी ठरली. निती आयोगाने गोव्याच्या प्रगतीबद्दल जे अभिप्राय दिलेले आहेत ती एक समाधानाची बाब आहे.

पूर्ण बहुमत हे आपण यशस्वी ठरल्याची पावती

आपण गोव्यामध्ये जी स्वयंपूर्ण गोवा योजना राबविली ती यशस्वी ठरली आणि तिचे कौतुक देखील खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यामुळे आपण अत्यंत समाधानी आहे. 2022 मध्ये पंतप्रधानांनी आपल्यावर ठेवलेला विश्वास आणि गोमंतकीय जनतेने आमच्या बाजूने दिलेला कौल महत्वाचा आहे. कोणत्याही पक्षाबरोबर युती न करता आम्ही घवघवीत यश संपादन केले. पूर्ण बहुमत प्राप्त केले, ही देखील आपण मुख्यमंत्री या नात्याने यशस्वी ठरल्याची पावती आहे.

भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्यात यशस्वी

जनता आपल्या सरकारवर खुश आहे. जे आपण प्रकल्प हाती घेतो, ज्या योजना हाती घेतल्या, ज्या सवलती जनतेला जाहीर केल्या, त्या प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही सर्व काही ऑनलाईन सुरू केले. त्यातून बऱ्यापैकी भ्रष्टाचार नियंत्रणात आणण्यात आम्हाला यश आले. भ्रष्टाचार मुक्त सरकार देणे यासाठी आम्ही केलेल्या प्रयत्नांना आज मोठ्या प्रमाणात यश आलेले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

युवकांना भाजपची दारे खुली

युवा वर्गाने राजकारणात यावे. त्यासाठी जनतेबरोबर जावे. जनतेची सेवा करावी. जनतेला विचारात, विश्वासात घ्यावे. जनतेच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि आपण देखील एक जनतेचा सेवक आहे, हा दृष्टिकोन बाळगून नंतर अवश्य राजकारणात यावे. आपण जसा युवा मुख्यमंत्री ठरलो तसेच आता नव्याने युवा राजकारणात यावेत आणि त्यांनी देखील जबाबदारी पेलावी. भारतीय जनता पक्षाने आपल्याला संधी दिली आणि आपल्याला मुख्यमंत्री बनविले ते देखील आपण युवा असताना. केवळ भारतीय जनता पक्षाच युवावर्गाला संधी देत असतो. त्यामुळे यापुढे देखील 2027 निवडणुकीमध्ये देखील युवा वर्गासाठी भाजपची दारे खुली आहेत.

दोनवेळा जिल्हा पंचायती जिंकल्या

आपल्या नेतृत्वाखाली गोव्यात दोन्हीवेळा जिल्हा पंचायतीवर भारतीय जनता पक्षाची निर्विवाद सत्ता आली. जनतेने पूर्णत: भाजपला साथ दिली. दोन्ही निवडणुका आपल्या नेतृत्वाखाली झाल्या होत्या, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. गोव्याचा ‘हॅपीनेस इंडेक्स’ वाढत आहे आणि तो अजून वाढावा यासाठी आपले अथक प्रयत्न आहेत. त्यासाठीच विविध योजना आणि प्रकल्प जनतेसाठी राबविलेले आहेत. जनतेचा सरकारवर व पक्षावर देखील पूर्ण विश्वास आहे. 2027 च्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला प्रस्थापिताविऊद्ध वातावरण दिसणार नाही. अँटी इन्कमबन्सी हा घटक आमच्या सरकारला लागणार नाही. आम्ही होईल तेवढी कामे करीत आहोत. जिथे शक्य नाही तिथे देखील आम्ही जाऊन जनतेला होईल तेवढी मदत करीत असतो. हेच आमचे सरकारचे धोरण राहील. आपण आज सातव्या वर्षात पदार्पण करीत आहोत हे जनतेचे आशीर्वाद आहेत आपल्यावर. भाजपने आणि नेत्यांनी ठेवलेला विश्वास यामुळेच आपण या राज्याचा विकास करू शकलो. जनतेला विश्वास आहे आणि जनतेच्या विश्वासाला नेहमीच पात्र राहीन, असे मुख्यमंत्री म्हणाले.

2027 च्या निवडणुकीनंतर भाजपच सत्तेवर येणार

गोव्याचा सर्वांगीण विकास हेच माझे स्वप्न आहे आणि या स्वप्नाला जनतेचे सहकार्य हेच खरे बळ आहे. त्या बळावरच आपले सरकार पुन्हा एकदा 2027 मध्ये बहुमत प्राप्त करून दाखवेल आणि गोव्यात भाजपचेच सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येणार आहे. कारण जनतेचा पाठिंबा विकासकामे करणाऱ्यांच्या बाजूला असतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आम्ही जे जे सांगितले ते सर्व करुन दाखवले

राज्यातील जनता सदैव आमच्या पाठीशी उभी राहिली त्या जनतेचे देखील आपण अत्यंत आभार मानतो. नव्याने आम्ही जेव्हा निवडणुकीला जाणार आहोत त्यावेळी जनता पुन्हा आमच्या पाठीशी राहील, कारण आमच्या पक्षाने व आमच्या सरकारने जे सांगितले ते करून दाखविले. काही वेळा काही नवीन प्रयोग करण्याचे ठरविले की त्यास विरोध होतो. जनतेला आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये विश्वासात घेतले व यापुढे देखील घेत राहणार आहोत.

दैनिक तरुण भारतशी साधलेला संवाद

  • या सरकारला ‘अँटी इन्कमबन्सी’ अजिबात नाही
  • सातपैकी पाच अर्थसंकल्प सादर केले शिलकी
  • पूर्ण बहुमत, ही आपण यशस्वी ठरल्याची पावती
  • पंतप्रधानांमुळे अनेक विकासप्रकल्प राबविण्यात यश
  • गोव्याच्या जनतेला स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त सरकार दिले
  • ‘माझे घर’ योजना देशभरात ठरली प्रशंसेस पात्र
  • विकासाची भीती, पण प्रत्येक गोष्टीस आंदोलन नको
  • जनतेच्या मतांचा आम्ही आदर करुन कार्य करतो
  • गोव्याचा पहिला युवा मुख्यमंत्री बनण्याचा मान मोठा
  • मुंडकारांचे प्रश्न सोडविले, पर्यावरण संतुलन राखले
  • गोव्याचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ अजून वाढविण्यासाठी प्रयत्न
Advertisement
Tags :

.