महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘सहकार’ हा आमच्या संस्कृतीचाच भाग !

06:47 AM Nov 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन : आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला दिल्लीत प्रारंभ

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी या परिषदेचे उद्घाटन केले. 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. सहकार हा आमच्या संस्कृतीचाच भाग असून ही परिषद भारताच्या सहकार क्षेत्राला नवी दृष्टी मिळवून देईल, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात केले. या परिषदेला केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि अनेक मान्यवर उपस्थित आहेत.

आंतरराष्ट्रीय सहकार युतीची ही परिषद भारतात प्रथमच आयोजित करण्यात आली आहे. भारतात आम्ही सहकार चळवळीला बळ देऊन ती विस्तारित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. भारताच्या भविष्यकालीन सहकार प्रवासाला या परिषदेमुळे नवी दिशा आणि बळ मिळेल. 21 व्या शतकात जागतिक सहकार क्षेत्र कशाप्रकारे साकारले जावे, याचे मार्गदर्शन या परिषदेत मिळेल. जागतिक सहकार क्षेत्रात या परिषदेमुळे नवचैतन्य निर्माण होईल, असा आशावाद त्यांनी प्रकट केला.

 

आमच्या रक्तातच सहकार

जगासाठी सहकार हे एक प्रारुप किंवा मॉडेल आहे. पण भारतासाठी सहकार हे त्यांच्या संस्कृतीचेच अंग आहे. ही आमची जीवनशैली आहे. त्यामुळे भारताने या क्षेत्रात मोठी प्रगती केली असून या क्षेत्राचे देशाच्या विकासात योगदानही महत्वाचे आहे. भारतात आजमितीला 8 लाख सहकारी संस्था आहेत. भारताच्या 98 प्रतिशत खेड्यांमध्ये त्यांचा विस्तार आहे. भारतातील 30 कोटी लोक या सहकारी संस्थांशी संलग्न आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात दिली.

सहकार बळकटीकरता पुढाकार

सहकार क्षेत्र बळकट व्हावे, यासाठी भारत सरकारने पुढाकार घेतला आहे. यासाठी केंद्र सरकारमध्ये नव्या विभागाची स्थापना केली आहे. सहकार विद्यापीठ स्थापन करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे. एप्रिल 2024 ते एप्रिल 2025 या कालावधीत हे विद्यापीठ साकारले जाणार आहे. या विद्यापीठामुळे सहकार क्षेत्राला लाभ होणार आहे, असे प्रतिपादन अमित शहा यांनी केले.

समृद्धीकरिता आवश्यक

सहकार चळवळ ही देशाची समृद्धी आणि समाजाच्या भल्याकरीता आवश्यक आहे. सहकारातून एका बळकट समाजाची निर्मिती होते. भूतानमध्ये सध्या 129 सहकारी संस्था आणि 722 शेतकरी गट आहेत. त्यांचे 17 हजार सदस्य आहेत. आमचा सहकारी संस्थांसंबंधीचा अनुभव सकारात्मक आहेत. भूतान आज सहकाराच्या माध्यमातून भारताच्या सीमेलगतच्या भूतानच्या भागात 2 हजार 500 चौरस किलोमीटरच्या प्रदेशात एका नव्या शहराची उभारणी करीत आहे. हे सहकाराचे उत्तम उदाहरण आहे, असे प्रतिपादन भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग टोबगे यांनी केले. त्यांनी त्यांच्या भाषणात परिषदेला महत्वाचे मार्गदर्शन केले.

 

फिजीमध्येही महत्त्व

फिजी या देशात सहकार चळवळीचा प्रारंभ 1940 मध्येच झाला आहे. या देशातील 15 क्षेत्रांमध्ये एकंदर 650 सहकारी संस्था आहेत. गरीबीच्या उन्मूलनासाठी सहकार हा अतिशय प्रभावी मार्ग आहे. फिजीमध्ये सहकार क्षेत्राचा मोठा विस्तार गेल्या पाच दशकांमध्ये झाला असल्याची माहिती फिजीचे उपपंतप्रधान मानोआ कामिकामिका यांनी त्यांच्या भाषणात दिली.

अमूल आणि इतर संस्थांकडून आयोजन

या परिषदेचे आयोजन अमूल, क्रिभको आदी भारतीय सहकारी संस्थांनी भारत सरकारसह केले आहे. ही परिषद 25 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. ‘सहकारातून सर्वांची समृद्धी’ हे या परिषदेचे घोषवाक्य आहे. या परिषदेत अनेक चर्चासत्रे, गटचर्चा आणि कार्यशाळा आदी कार्यक्रम होणार आहेत.

130 वर्षांचा इतिहास

जागतिक सहकारी संस्थांची युती असणाऱ्या आयसीए जागतिक सहकार परिषदेला आणि आयसीए सर्वसाधारण सभेला 130 वर्षांचा इतिहास आहे. या संस्था जागतिक सहकार क्षेत्रातील सर्वाधिक महत्वाच्या आणि अग्रणी संस्था मानल्या जातात. या संस्थांनी जगात सहकार चळवळ रुजविण्यासाठी मोठे कार्य आजपर्यंत केलेले असून अशा या संस्थांची परिषद भारतात प्रथमच होत आहे.

देशाच्या विकासाचा महामार्ग

ड सहकार हा देशाच्या सर्वांगिण विकासाचा महामार्ग असल्याचे परिषदेत मत

ड विविध देशांच्या नेत्यांनी दिली आपापल्या देशांतील सहकार क्षेत्राची माहिती

ड पाच दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये विविध चर्चासत्रे आणि कार्यशाळांचे आयोजन

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article