For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

थंडीने कडधान्यांना पोषक वातावरण

10:41 AM Jan 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
थंडीने कडधान्यांना पोषक वातावरण
Advertisement

काही भागात कडधान्य पिक धोक्यात

Advertisement

बेळगाव : मागील काही दिवसांपासून थंडीत वाढ झाल्याने कडधान्य पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मध्यंतरी थंडी कमी झाली होती. शिवाय वातावरण बदलामुळे कडधान्य पीक धोक्यात आले होते. मात्र पुन्हा थंडी-धुके पडत असल्याने कडधान्याला समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र यंदा कडधान्य उत्पादनाला फटका बसण्याची भीतीही व्यक्त होत आहे. रब्बी हंगामात मसूर, हरभरा, वाटाणा, मोहरी आदी पिकांची पेरणी केली जाते. मात्र यंदा पावसाअभावी पेरणी क्षेत्रातही काहीशी घट झाली आहे. मात्र त्यानंतरही पोषक वातावरण मिळाले नसल्याने वाढीवर परिणाम झाला होता. मध्यंतरी किडीचा प्रादुर्भावही वाढला होता. त्यामुळे पिके धोक्यात येण्याची चिंता व्यक्त होत होती. मात्र थंडीची तीव्रता वाढताच कडधान्य जोमाने येवू लागले आहे.

येळ्ळूर, धामणे, झाडशहापूर, वडगाव, कंग्राळी, हलगा, नंदिहळ्ळी आदी भागात कडधान्याची पेरणी करण्यात आली आहे. मात्र मागील काही वर्षांपासून कडधान्याच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्थानिक कडधान्य मिळणे कठीण होवू लागले आहे. त्यामुळे नागरिकांनाही बाजारात हायब्रिड कडधान्य खरेदी करावे लागत आहे. बेळगाव परिसरातील मसूर व इतर कडधान्याला अधिक मागणी होती. मात्र उत्पादन घटत असल्याने स्थानिक कडधान्य मिळणे अशक्य झाले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उरली, सुरली आशा रब्बी हंगामावर आहे. मात्र बदलत्या हवामानामुळे काही भागातील कडधान्य पीक धोक्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.