मी नाही आणि तू आहेस अशी खात्री झाली की देहबुद्धी नष्ट होते
अध्याय नववा
सगुणोपासना व निर्गुणोपासना यातील तुला काय आवडतं असा प्रश्न वरेण्याने बाप्पाना विचारला. त्यावर बाप्पांनी उत्तर दिलं की, मला सगुणोपासना करणारा भक्त जास्ती प्रिय आहे. सगुणोपासना करणारा भक्त जास्ती प्रिय का, ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की, मुळातच देवाची भक्ती करावी असे वाटणारा मनुष्य लाखात एखादा असतो.
तसं बघितलं तर स्वार्थ साधण्यापूर्ती देवभक्ती करणारे खूप आहेत पण त्यांच्यादृष्टीने तो एक व्यवहार असतो. मी अमुक एक केलं तर मला तमुक एक हवं आहे ते देव देईल असा विचार त्यामागे असतो. अशा भक्तानाही देव पावतो पण त्यांनी मागितलेली वस्तू नाशवंत असल्याने त्यातून त्यांचे कायमचे भले होत नाही पण मला तुझ्याकडून काहीही नको आहे फक्त तुझे प्रेम मला दे असे म्हणणारा लाखात एखादाच असतो आणि असा सगुणोपासना करणारा भक्त देवाचा लाडका होतो. सगुणोपासनेची सुरवात देवाकडून हवं ते मिळण्याच्या उद्देशाने सुरु होते. त्यासाठी केलेल्या भक्तीमुळे देव प्रसन्न होईल व आपली मागणी पूर्ण करेल अशी त्याला खात्री असते. परमार्थात ह्यालाच श्रद्धा असे म्हणतात.
माणसाला प्रेम करायला समोरची व्यक्ती त्याच्यासारखी दिसणारी हवी असते. सगुणोपासनेतील मूर्ती नामरूपाने त्याच्यासारखीच असल्याने देवाबद्दल त्याला प्रेम, ममत्व वाटू लागते. तो करत असलेल्या भक्तीची प्रचीती काही प्रमाणात येऊ लागली की, त्याचे ईश्वरावरील प्रेम वाढू लागते. तसेच त्याने मागणीनुसार दिलेल्या वस्तू या कायम टिकणाऱ्या नसून तात्पुरत्या आहेत हेही लक्षात येऊन त्यातूनच संसारातील गोष्टींचं गौणत्व लक्षात येते मग कायम टिकणारी वस्तू म्हणजे नित्य वस्तू हवी असा भक्ताचा आग्रह राहतो. ही नित्य वस्तू म्हणजे ईश्वर होय. त्यादृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू होतात. ईश्वरावर त्याचे प्रेम दिवसेंदिवस वाढत जाऊन त्याला सर्वत्र त्याचाच भास होऊ लागतो. सर्वत्र ईश्वराचा भास होऊन ईश्वर सर्वव्यापी आहे हे लक्षात आले की, त्याची निर्गुणोपासना सुरू होते. हा प्रवास खूप लांबचा व दीर्घकाळ चालणारा आहे हे लक्षात घेऊन पुढील श्लोकात बाप्पा सांगतात की, निर्गुणोपासना कठीण असल्याने सगुणोपासना करणाऱ्याचाही मी उध्दार करतो.
अव्यक्तोपासनाद्दुऽ खमधिकं तेन लभ्यते ।
व्यक्तस्योपासनात्साध्यं तदेवाव्यक्तभक्तितऽ।। 6।।
अर्थ- अव्यक्त उपासना कठिण आहे म्हणून अव्यक्त उपासना क्लेशदायक आहे. व्यक्त उपासनेच्या योगाने जे साध्य होते तेच अव्यक्त भक्तीच्या योगाने साध्य होते.
विवरण- मागील श्लोकात बाप्पांनी सांगितले होते की, अव्यक्त म्हणजे निर्गुण उपासना करणाऱ्यांचा मी लवकर उध्दार करतो पण अव्यक्त म्हणजे समोर ईश्वराची मूर्ती दिसत नसताना मनाची एकाग्रता होणं कठीण आहे कारण समोर दिसणाऱ्या दृश्य वस्तू माणसाला खुणावत असतात व त्याचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आपोआपच अव्यक्त म्हणजे निर्गुण निराकार ईश्वरावर चित्त एकाग्र करणे अधिकाधिक कठीण होत जाते व आपल्याला अव्यक्त उपासना जमणे शक्य नाही असा क्लेशदायक विचार मनात येऊन भक्त दु:खी होतो. त्याने निराश होऊन भक्ती सोडून देऊ नये म्हणून बाप्पा सांगतायत, अव्यक्त उपासनेच्या योगाने जे साध्य होते तेच व्यक्त भक्तीच्या योगाने साध्य होते. देहबुद्धी विसरणे म्हणजे मी म्हणजे हा देह हे विसरणे होय. हेच उपासना करणाऱ्याचे उद्दिष्ट असतं. देह असला किंवा नसला तरी काहीही फरक पडत नाही अशी खात्री व्हायला हवी. नामदेव महाराजांनी अशी अनुभूती घेऊन अभंग रचला तो असा, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो.
क्रमश: