गणेश मुर्ती विसर्जनासाठी कन्वेअर मशिन आज बसणार
पुण्यातील अधिकाऱ्यांकडून चाचणी, घरगुती गणेश विसर्जनासाठी महापालिका यंत्रणा सज्ज; प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्याकडून इराणी खण परिसराची पाहणी
कोल्हापूर प्रतिनिधी
घरगुती गणपती विसर्जनाकरिता महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून, विविध विभागातील 2 हजार कर्मचारी, 600 वाहने, जेसिबी अशी यंत्रणा तैनात करण्यात आली. विसर्जनासाठी इराणी खणीवर स्वयंमचलित यंत्र (कन्वेअर बेल्ट) आज (मंगळवारी) बसविण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्यासह अधिकाऱ्यांनी इराणी खणीसह विसर्जन मार्गाची पाहणी केली.
घरगुती गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सोमवारी दुपारी आढावा घेतला. यावेळी मिरवणूक व मुख्य मार्गावरील रस्ते दोन दिवसात डांबरी पॅचवर्क करणे, विभागीय कार्यालयातील विसर्जन कुंडांची तपासणी व इतर आवश्यक ती साधन सामुग्री तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-आयुक्त पंडीत पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, सहा.आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील, नेहा आकोडे, पर्यावरण अभियंता अवधूत नेर्लेकर उपस्थित होते.
2 हजार कर्मचारी, 600 वाहने
विसर्जनासाठी महापालिकेतील 2 हजार अधिकारी, कर्मचारी तैनात आहेत. अधिकाऱ्यांसह अधीक्षक, सहा.अधिक्षक व लिपीक संवर्गातील 500 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. के.एम.टी.कडील 180 तर शिक्षण विभागातील 80 कर्मचारी नेमले आहेत. चार विभागीय कार्यालयाअंतर्गत पवडी विभागाचे 500, आरोग्य विभागाचे 1200 कर्मचारी, गणेश मुर्ती संकलनासाठी 145 टँम्पो 450 हमाल, 5 जे.सी.बी., 7 डंपर, 4 टॅक्टर, 4 पाण्याचे टँकर, 2 बुम, 5 अॅम्ब्युलन्स व 7 साधे तराफे व 7 फलोटींगचे तराफे अशी यंत्रणा सज्ज आहे. अग्निशमन दलाचे जवानही विसर्जनस्थळी सुरक्षिततेसाठी तैनात आहेत. विद्युत विभागाकडून विसर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था केली आहे. आरोग्य विभागाच्यावतीने विसर्जन ठिकाणांची साफसफाईसाठी आरोग्य निरीक्षकांच्या 12 टिम तयार केल्या आहेत.
198 ठिकाणी कृत्रिम कुंड
विर्सजनाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार असून नागरीकांचे प्रबोधन करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी प्रबोधनात्मक फलकही लावले आहेत. पंचगंगा नदी तसेच शहर परिसरातील तलावांचे प्रदूषण होऊ नये म्हणून महापालिकेच्यावतीने शहरात सर्व प्रभागात विविध ठिकाणी 198 गणेश विसर्जन कुंड, निर्माल्य कुंड व मंडळांच्यावतीने काहीलींची पर्यायी व्यवस्था केली आहे. नागरिकांनी विसर्जन कुंडामध्ये विर्सजन केलेल्या गणेशमुर्ती एकत्र करुन टॅम्पोमधून इराणी खणीमध्ये विसर्जीत करण्यात येणार आहे.
निर्माल्यामधून होणार खत निर्मिती
संकलित झालेले निर्माल्य खत तयार करण्यासाठी पुईखडी, बापट कॅम्प, बावडा, दुधाळी, आयसोलेश हॉस्पीटल येथे पाठविण्यात येणार आहे. याठिकाणी एकटी, संस्थेच्या महिलांच्याकडून निर्माल्याचे विलगीकरण करुन खत निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी अवनी, एकटी व वसुंधरा या संस्थेच्या 150 महिला हे काम करणार आहेत. तरी शहरातील नागरिकांनी महापालिकेच्यावतीने व्यवस्था करण्यात आलेल्या कृत्रिम कुंडामध्येच गणेशमुर्ती व निर्माल्य देऊन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.
स्वयंमचलित यंत्राची आज चाचणी
इराणी खण येथे गणेश मुर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र मंगळवारी बसविण्यात येणार आहे. याची चाचणी मंगळवारी घेण्यात येणार आहे. या यंत्राच्या तपासणीसाठी पुणे येथील अधिकारी सोमवारी कोल्हापूरात आले आहेत. त्यांनी उमा टॉकीज येथील सुभाष स्टोअर्स येथे यंत्राची पाहणी केली.
प्रशासकांकडून विसर्जन मार्गाची पाहणी
प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी दुपारी विसर्जन मार्गाची पाहणी केली. उमा टॉकीज, सावित्रीबाई फुले हॉस्पीटल, टेंबे रोड, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळावेश, रंकाळा टॉवर, पद्माराजे उद्यान. राजकपूर पुतळा, इराणी खण या मार्गाची पाहणी केली. यानंतर प्रशासकांनी सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर, देवकरपाणंद, इराणी खण या पर्यायी मिरवणूक मार्गाचीही पाहणी केली.