भाजपविरोधी वातावरण जनतेपर्यंत पोहोचवा
गोव्यातील काँग्रेस नेत्यांना केंद्रीय नेत्यांचा कानमंत्र
पणजी : भाजपच्या डबल इंजिन सरकारमध्ये चाललेले गैरकारभार आणि भ्रष्टाचाराविऊद्ध राज्यात जनजागृती करतानाच 2027 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक पातळीवर पक्ष अधिक मजबूत करण्याच्या तयारीला लागा, असा संदेश काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने गोव्यातील नेत्यांना दिला आहे. गोव्यातील प्रमुख नेत्यांनी काल मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय नेत्यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. या नेत्यांमध्ये गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गिरीश चोडणकर यांची उपस्थिती होती.
बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस वेणूगोपाल यांनी त्यांना मार्गदर्शन केले. गोव्यात भ्रष्टाचाराच्या मुद्यावर व्यापक जनजागृती करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. त्यासाठी संघटनात्मक फेरबदल आणि बूथ पातळीवर पक्ष मजबूत करण्यावर हायकमांडने भर दिला आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर वाढती महागाई, बेरोजगारी, खाण उद्योग, पर्यटन क्षेत्रातील प्रश्न, पर्यावरण संरक्षण तसेच युवक आणि शेतकऱ्यांशी संबंधित मुद्यांवर सखोल विचारमंथन झाल्याचे पाटकर यांनी सांगितले. त्यावर बोलताना खर्गे यांनी, अशाप्रकारे राज्यात निर्माण झालेले सरकारविरोधी वातावरण जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाने आक्रमक भूमिका घ्यावी, असा सल्ला दिल्याची माहिती पाटकर यांनी दिली.