For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धर्मांतर खपवून घेणार नाही

12:13 PM Nov 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
धर्मांतर खपवून घेणार नाही
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा इशारा : भगवान बिरसा मुंडा जयंती सोहळा

Advertisement

सांखळी : ब्रिटिश आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विशेषत: आदिवासी लोकांना सहकार्य करण्याच्या हेतूने धर्मपरिवर्तीत करण्यासाठी लक्ष्य बनवित असत. गोव्यात हेच कारस्थान पोर्तुगीजांनी केले याची जाणीव सर्वांना आहे. गोव्यात मुक्तीच्या 60 वर्षांनंतरही ‘आलुलीया..’ म्हणून अशाच प्रकारे आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक दुर्बल लोकांना हेरुन त्यांचे धर्मांतरण केले जात होते. असे धर्मांतर आता गोव्यात खपवून घेतले जाणार नाही, हे ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांखळी येथे केले. सांखळी रवींद्र भवनात काल शुक्रवारी आदिवासी कल्याण मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती सोहळ्dयात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय आदिवासी मंत्रालयाच्या उपसचिव एन. एस. राजी, उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते, अतिरिक्त जिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर, अदिवासी कल्याण संचालनालयाचे संचालक दशरथ रेडकर, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, नगराध्यक्ष सिद्धी प्रभू पोरोब, उपजिल्हाधिकारी रोहन कासकर, आरोग्य अधिकारी अतुल पै बीर आदींची उपस्थिती होती.

धर्मांतरण रोखण्यासाठी उठाव

Advertisement

आपल्या समाजाचे व आपण राहत असलेल्या परिसराचे, जंगलाचे रक्षण करण्याच्या हेतूने भगवान बिरसा मुंडा यांनी केलेले काम प्रेरणादायी आहे. आदिवासी समाजातील लोकांना मशिनरी स्कूल सुरू करुन शिक्षणांच्या बहाण्याने त्यांच्या आर्थिक बिकट परिस्थितीचा फायदा उठवत त्यांचे धर्मांतरण करण्याचे षडयंत्र ब्रिटिश सरकारतर्फे रचले जात होते. त्याचा विरोध करत बिरसा मुंडा यांनी उठाव व जागृती केली. हा उठाव धर्मांतरण रोखण्यासाठी तर होताच, पण त्याचबरोबर ब्रिटिशांपासून आदिवासींची जंगले, वनक्षेत्र राखून ठेवण्यासाठीही होता, असे मुख्यमंत्री म्हणाले.

चंदन चोरण्यासाठी आले ब्रिटिश

ज्या जमिनीत आपण राहतो त्या जंगलाची व जंगलातील झाडांची पूजा करतो. मंदिरात आजही येणाऱ्या मातीच्या वारूळाची आपण देवी सातेरीच्या रूपाने पूजा करतो. या जंगलातील धन म्हणजेच चंदन व इतर झाडांची तस्करी करण्यासाठी ब्रिटिश येथे आले होते. आमच्या प्रेमाने ब्रिटिश येथे आले नव्हते.

बिरसा मुंडानी ब्रिटिशांविरुद्ध दिला लढा

भारत हा सोने पिकविणारा देश होता. या देशाची लूट करण्यासाठी ब्रिटिश येथे आले होते. या ब्रिटिशांच्या कारस्थानांना बळी न पडता आपली जंगले, समाज, धर्म याचे रक्षण करण्यासाठी भगवान बिरसा मुंडासारख्या आदिवासी नेत्यांनी लढा दिला, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

आदिवासींच्या विकासाचे भाजपचे प्रयत्न

आजच्या तरूणांसाठी बिरसा मुंडा हे आदर्श आहेत. त्यांच्यातील अनेक गोष्टी आत्मसात करण्यासारख्या आहेत. देशाच्या या नेत्याबाबत आजपर्यंत कोणत्याही सरकारने माहिती समोर आणली नाही. ती प्रथमच भाजप सरकारने देशभर पसरवत त्यांच्या जयंतीनिमित्त मोठा सोहळा आयोजित केला आहे. आदिवासी समाजाला आजपर्यंत कोणत्याही सरकारने न्याय देण्याचा प्रयत्न केला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या, गावच्या विकासासाठी 6600 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. आदिवासी समाजातील लोकांना प्रमुख प्रवाहात आणण्यासाठी भाजप सरकारने मोठे प्रयत्न केले आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

 दहा हजार प्रकरणे निकाली काढली

गोव्यातही आदिवासी समाजातील लोकांना आपल्या न्याय हक्कासाठी 2009 मध्ये संघर्ष करावा लागला ही खेदाची बाब आहे. वन क्षेत्रात पिके घेणाऱ्यांना जंगलांचे हक्क मिळविण्यासाठी आदिवासी समाजातील लोकांचे सुमारे 10 हजार अर्ज प्रलंबित पडले होते. आपण मुख्यमंत्री होताच सदर सर्व प्रकरणे निकाली काढली. गोव्याच्या सांगेतील एका आदिवासी गावाला रस्ता देण्याचे काम आपल्या कार्यकाळात झाले ही अभिमानास्पद बाब आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह भाषण मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी पाहिले. या खास कार्यक्रमानिमित्त साखळी रवींद्र भवनात वैद्यकीय शिबिरासह इतर केंद्र सरकारच्या योजनांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली.

Advertisement
Tags :

.