‘सल्तनत-ए-बांग्ला’ समुहावरून वादंग
ग्रेटर बांगलादेशच्या नकाशात भारताचे हिस्से : संसदेत सरकारने दिले प्रश्नाला उत्तर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘सल्तनत-ए-बांग्ला’ समुहाकडून तयार करण्यात आलेल्या ‘ग्रेटर बांगलादेश’ नकाशात भारताच्या काही हिस्स्यांना सामील करण्यात आले होते. हा नकाशा ढाका विद्यापीठात प्रदर्शित करण्यात आला होता. यासंबंधी काँग्रेसचे खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी राज्यसभेत विदेशमंत्री एस. जयशंकर यांना या दुष्प्रचाराला सामोरे जाण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांविषयी विचारणा केली होती. देशाची सुरक्षा आणि त्याचे हित सर्वोपरि असल्याचे म्हणत केंद्र सरकारने बांगलादेशला त्याच्या भूमीवर ‘सल्तनत-ए-बांग्ला’ समूह सक्रिय असल्याचे कुठलेच पुरावे मिळालेले नसल्याची माहिती शुक्रवारी दिली.
ढाका येथे ‘सल्तनत-ए-बांग्ला’ नावाच्या एका धार्मिक कट्टरवादी समुहाने कथित स्वरुपात ‘ग्रेटर बांगलादेश’चा एक नकाशा जारी केला असून यात भारताचे काही हिस्से दाखविण्यात आले आहेत. या धार्मिक कट्टरवादी सुमहाला तुर्कियेच्या ‘तुर्की यूथ फेडरेशन’ नावाच्या संघटनेचे समर्थनप्राप्त आहे. बांगलादेश सरकारच्या ‘फॅक्ट चेक प्लॅटफॉर्म’ ‘बांग्लाफॅक्ट’ने बांगलादेशात ‘सल्तनत-ए-बांग्ला’ सक्रिय असल्याचे कुठलेच पुरावे नसल्याचा दावा केला असल्याची माहिती जयशंकर यांनी संसदेत दिली आहे.
हा वादग्रस्त नकाशा पूर्वाश्रमीच्या बंगाल सल्तनतच्या संदर्भात एका प्रदर्शनात मांडण्यात आला होता. हे प्रदर्शन 14 एप्रिल 2025 रोजी ढाका विद्यापीठात आयोजित करण्यात आले होते. याच्या आयोजकांनी कुठल्याही विदेशी राजनयिक संस्थेशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवर प्रभाव पाडणाऱ्या सर्व घटनाक्रमांवर बारकाईने नजर ठेवून असते आणि याच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाय देखील करत असल्याचे जयशंकर यांनी सांगितले आहे.