तामिळनाडू विधानसभा अध्यक्षांच्या विधानामुळे वाद
विकासाचे श्रेय दिले ख्रिश्चन संस्थांना ः भाजपकडून जोरदार टीका
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडू विधानसभा अध्यक्षांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. कॅथोलिक मिशनरीज नसत्या तर तामिळनाडू आणखी एक बिहार ठरले असते. तामिळनाडूतील विकासाचे शेय हे कॅथोलिक मिशनरींचे असल्याचे विधान एम. अप्पावु यांनी केले आहे. द्रमुक आमदार आणि विधानसभा अध्यक्ष अप्पावु यांच्या या विधानावर भाजपने आक्षेप घेतला आहे.
विधानसभा अध्यक्षांनी माफी मागायला हवी. त्यांचे हे विधान पूर्णपणे सांप्रदायिक आहे. द्रमुकची मानसिकता ही हिंदूविरोधी असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते मोहन कृष्ण यांनी केली आहे.
कॅथोलिक मिशनरींची माझ्या जीवनात महत्त्वाची भूमिका आहे. माझे जीवन कॅथोलिक मिशनरींनीच घडविले आहे. राज्यातील द्रमुक सरकार हे कॅथोलिक समुदायानेच आणले आहे हे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन जाणून आहेत. जर कॅथोलिक मिशनरींना तामिळनाडूतून हटविले असते तर कुठलाच विकास झाला नसता आणि तामिळनाडू हे बिहारप्रमाणे मागास राहिले असते असे अप्पावु यांनी म्हटले आहे. याप्रकरणी द्रमुक किंवा मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी कुठलीच टिप्पणी केलेली नाही.
वादानंतर स्पष्टीकरण
स्वतःच्या विधानावर वाद झाल्यावर अप्पावु यांनी आपण केवळ इतिहासाबद्दल सांगत होतो असे म्हटले आहे. ख्रिश्चन संस्थांनी शिक्षणाला चालना देत समाजात समानता आणली. माझ्या शिक्षणाचे श्रेय देखील मिशनरींनाच असल्याचे अप्पावू म्हणाले.
हिंदूंना कमी लेखण्याचा प्रकार
द्रमुक सरकार नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. या सरकारचा अजेंडा तामिळनाडूतील हिंदूंना कमी लेखण्याचा आणि राज्यात हिंदूविरोधी प्रचाराला बळ पुरविण्याचा असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते मोहन कृष्ण यांनी केला आहे.