बीबीसीच्या माहितीपटावरून वादंग
लंडन : बीबीसीकडून गाझपट्टीवर निर्मित माहितीपटावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. लंडन येथील बीबीसी मुख्यालयाबाहेर उग्र निदर्शने झाली आहेत. बीबीसीने हमासशी निगडित लोकांना व्यासपीठ पुरविल्याचा आरोप या निदर्शकांकडून करण्यात येत आहे. यादरम्यान निदर्शकांनी घोषणाबाजी करत झेंडे फडकविले आहेत. या निदर्शकांना प्रसिद्ध अभिनेत्री डेम मोरीन लिपमॅन समवेत अनेक नेत्यांनी संबोधित केले आहे. बीबीसीच्या माहितीचा बाल-प्रस्तावक अब्दुल्लाह हा हमासचा वरिष्ठ सदस्य अयमान अलयाजौरीचा पुत्र असल्याचे समोर आल्यावर हा वाद निर्माण झाला आहे. बीबीसीचा माहितीपट ‘गाझा : हाउ टू सर्वाइव अ वॉरझोन’मध्ये गाझामध्ये युद्धादरम्यान मुलांची स्थिती दाखविणारा होता, परंतु यात सामील लोकांच्या पार्श्वभूमीवरुन प्रश्न उपस्थित झाल्यावर बीबीसीने हा माहितीपट स्वत:च्या प्लॅटफॉर्मवरून हटविला.
बीबीसीने स्वत:ची चूक मान्य करत एक प्रारंभिक समीक्षा केली आणि आता अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. या माहितीपटात दाखविण्यात आलेली अनेक मुले ही हमासशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. तसेच यात काही संवादाचे चुकीचे अनुवाद करण्यात आल्याचा आरोप होतोय. माहितीपट निर्माण करणारी प्रॉडक्शन कंपनी होयो फिल्म्सने बाल-प्रस्तावक अब्दुल्लाहच्या आईला तिच्या बहिणीच्या बँक खात्याद्वारे पैसे दिले होते अशी कबुलीही बीबीसीने दिली आहे. आता बीबीसी याप्रकरणी प्रॉक्डशन कंपनीकडुन अतिरिक्त स्पष्टीकरण मागवत आहे. ब्रिटनच्या संस्कृती सचिव लिसा नांडी यांनी बीबीसीवर याप्रकरणी निष्काळजीपणा दाखविल्याचा आरोप करत तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. तर बीबीसीच्या विरोधात आता ब्रिटनमध्ये जोरदार आवाज उठत आहेत. तर दुसरीकडे प्रेझेंटर गॅरी लिनकर आणि अनिता रानी, अभिनेता रिज अहमद आणि मिरियम मार्गोलीज समवेत 500 हून अधिक मान्यवरांनी हा माहितीपट हटविण्याच्या कृतीची निंदा केली आहे.