For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राहुल गांधी यांच्या विधानावरून गदारोळ

06:03 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
राहुल गांधी यांच्या विधानावरून गदारोळ
Advertisement

भारत-चीन संघर्षावरून शब्दयुद्ध : लोकसभेचे कामकाज तहकूब

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026-2027 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सोमवारी लोकसभेत राहुल गांधी यांच्या वादग्रस्त विधानावरून मोठा गदारोळ उठला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना गांधी यांनी काही वर्षांपूर्वी घडलेल्या भारत आणि चीन यांच्या लडाखमधील संघर्षाचा मुद्दा उकरुन काढला. भारताचे निवृत्त भूसेनाप्रमुख मनोज नरवणे यांच्या अद्याप प्रकाशन न झालेल्या पुस्तकातील काही भागाचा उल्लेख गांधी यांनी एका नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखाच्या माध्यमातून केला. त्यांच्या या कृतीला संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यामुळे सत्ताधारी सदस्य आणि विरोधी सदस्य यांच्यात घनघोर शब्दयुद्ध घडल्याचे पहावयास मिळाले.

Advertisement

संघर्षाच्या काळात चीनचे रणगाडे डोकलामपर्यंत येत होते, असे विधान गांधी यांनी या लेखाच्या आधारावर केले. तथापि, लोकसभेच्या नियमानुसार, जे पुस्तक अद्याप प्रकाशितही झालेले नाही, त्या पुस्तकातील आशयाचा उल्लेख करणे अयोग्य ठरते, असा मुद्दा गांधी यांच्या वक्तव्यात हस्तक्षेप करताना संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी उपस्थित केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही नियमांचा उल्लेख करत राहुल गांधी असे वक्तव्य करू शकणार नाहीत, असे ठणकावले. तरीही गांधी यांचा आग्रह होतच राहिला. काँग्रेसच्या आणि अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गांधी यांना पाठिंबा दिला. त्यामुळे लोकसभेत प्रचंड घोषणाबाजी झाली आणि कामकाज काही काळासाठी स्थगित करावे लागले. तरीही गदारोळ शांत झाल्याचे दिसले नाही.

नियम काय आहेत...

ज्या कागदपत्रांचा लोकसभेशी किंवा संसदेशी संबंध नाही, अशा कागदपत्रांचा आधार संसदेत वक्तव्य करताना घेता येत नाही, असा नियम आहे. वृत्तपत्रे. लेख, खासगी पुस्तके किंवा अन्य स्रोत यांच्यातून घेतलेल्या माहितीचा आधार आरोप करताना घेता येत नाही. नरवणे यांच्या पुस्तकाचे तर अद्याप प्रकाशनही झालेले नाही. अशा साधनाचा उपयोग करण्याचा राहुल गांधी यांना अधिकार नाही, असे राजनाथसिंग यांचे म्हणणे होते. अमित शाह यांनीही याच मुद्द्यावर भर दिला. ओम बिर्ला यांनीही गांधी यांना नियम समजावून सांगण्याचा प्रयत्न करून पाहिला.

गांधींचे म्हणणे काय...

राहुल गांधी यांना त्यांचे म्हणणे पूर्ण करू द्यावे. नंतर आवश्यकता असल्यास सत्ताधारी सदस्य त्यांचे म्हणणे खोडून काढू शकतात, असे विरोधी पक्षांच्या सदस्यांचे म्हणणे होते. तथापि, कोणत्याही कारणास्तव संसदेच्या नियमाचा भंग होता कामा नये. तशी परंपरा पडता कामा नये. तसे झाल्यास संसदेत बेशिस्त निर्माण होईल आणि नियम सरसकट धाब्यावर बसविले जातील. असे करण्याची अनुमती देता कामा नये, असे सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांचे म्हणणे दिसून आले.

तेजस्वी सूर्या यांचा संदर्भ

हा मुद्दा उठविण्याची आपली इच्छा नव्हती. तथापि, भारतीय जनता पक्षाचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी त्यांच्या भाषणात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे आम्हाला हा म्द्दा उपस्थित करावा लागत आहे, अशी मल्लीनाथी राहुल गांधी यांनी केली. मात्र, अमित शाह यांनी गांधी यांचा मुद्दा खोडून काढला. तेजस्वी सूर्या यांच्या भाषणात त्यांनी कोणत्याही क्षणी कोणाच्याही देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नव्हते, असा प्रतिटोला त्यांनी लगावला. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये घोषणायुद्ध झाले.

लोकसभेचे कामकाज स्थगित

या मुद्द्यावर निर्माण झालेल्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. नंतरही गदारोळ होतच राहिल्याने ते दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरची ही चर्चा संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये होत असेल. ती एकंदर, 18 तास चालणार आहे, अशी महिती देण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या द्वितीय सत्रात अर्थसंकल्पावर करून तो संमत केला जाणार आहे.

अभिभाषणावरील चर्चेला प्रारंभ

ड संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला प्रारंभ

ड सोमवारी लोकसभेत सत्तधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात जोरदार शब्दयुद्ध

ड लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले सभागृहातील कामकाज स्थगित

Advertisement
Tags :

.