शोभायात्रेवेळी वाद : कलबुर्गी येथे जमावबंदी
किरकोळ दगडफेकीमुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था
बेंगळूर : अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कलबुर्गी जिल्ह्यातील वाडी येथे सोमवारी श्रीराम शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेवेळी रात्री उशिरा दोन गटात वाद झाल्यानंतर दगडफेकीची घटना घडली. त्यामुळे तणाव निर्माण झाल्याने वाडी येथे तीन दिवसापर्यंत (25 जानेवारी) जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे. अनुचित घटना घडू नये यासाठी शहरात कडेकोड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोमवारी दुपारी वाडी बसस्थानकाजवळील रेस्टॉरंट बंद करण्यावरून युवकांच्या दोन गटात वाद झाला. वाद विकोपाला जाण्याआधीच पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटातील युवकांची समजूत काढून पाठवून दिले होते. त्यानंतर सायंकाळी शोभायात्रा सुरू झाली. शोभायात्रेवेळीच दोन गटामध्ये वाद निर्माण झाला. यावेळी किरकोळ दगडफेकीची घटना घडली.
त्यामुळे तणाव निर्माण झाला. त्यानंतर पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केला. पोलिसांनी शोभायात्रा रोखून धरल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्ते संतप्त झाल्याचे समजते. दरम्यान, याने चित्तापूरचे तहसीलदार सय्यद शावली यांनी 25 जानेवारी रोजी सकाळी 6 पर्यंत वाडी शहरात जमावबंदीचा आदेश जारी केला. त्यामुळे मंगळवारी शहरातील बाजारपेठ ठप्प झाली. रस्त्यावर सर्वत्र तणावपूर्ण शांतता होती. मंगळवारी कलबुर्गीचे जिल्हाधिकारी फौजिया तरन्नूम यांनी मंगळवारी वाडी नगरपरिषद कार्यक्षेत्रात संपूर्ण मद्यविक्रीवर निर्बंध घातले. त्यानुसार गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत शहरात कोणत्याही प्रकारचे मद्यविक्रीची दुकाने, बार-रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोन युवकांच्या गटात वाद निर्माण झाल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी जमावावर तातडीने नियंक्षण आणले. परिसरात तणाव नसून खबरदारी म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.