कडोलीत काळादिन पाळल्याने वादावादी
काही कन्नडीगांकडून दुकाने सुरू ठेवण्यासाठी दादागिरी
प्रतिनिधी/ बेळगाव
केंद्र सरकारच्या विरोधात मागील 68 वर्षांपासून सीमाबांधव 1 नोव्हेंबर हा काळादिन म्हणून पाळतात. त्यामुळे कडोली येथेही स्वयंस्फूर्तीने शुक्रवारी काळादिन गांभीर्याने पाळण्यात आला. मात्र काही उन्माद कन्नडीगांनी याला विरोध करत तुमची दुकाने सुरू ठेवा, अशी दादागिरी केली. त्यामुळे यावेळी वादावादीचा प्रसंग घडला.
कडोली येथील मुख्य बाजारपेठेतील अत्यावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतरांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. स्वयंस्फूर्तीने काही दुकानदारांनी आपली दुकाने बंद करून काळादिन गांभीर्याने पाळला. दरम्यान, काही कानडीगांनी याला विरोध करून दुकाने उघडण्यास भाग पाडले. दरम्यान, काहींनी हा प्रकार केल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात अशांतता पसरविण्याचा हा प्रकार असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
गावातील डॉ. आंबेडकर गल्लीपासून राज्योत्सवाची मिरवणूक काढण्यात येत होती. मात्र ही मिरवणूक दुपारी 2 वाजता कलमेश्वर गल्ली येथे आली असताच काहींनी आपली दुकाने बंद केले. त्यामुळे काहींनी सदर दुकाने उघडण्यास सांगितले. मोजक्याच कन्नडीगानी हा प्रताप केला. परिणामी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद केल्यानंतरही दादागिरीची भाषा वापरत तरुणांनी दुकाने का बंद करत आहात? राज्योत्सवानिमित्त दुकाने सुरू राहिली पाहिजे, अन्यथा तुम्हाला दाखवू, असा दम दिला. त्यामुळे काही तरुणांनी आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात 68 वर्षांपासून काळादिन पाळतो. त्यामुळे आम्ही दुकाने बंद ठेवली आहेत, असे सांगितले. दरम्यान, काही उन्माद कन्नडीगांनी लाठ्या, काठ्या घेऊन व्यावसाय करणाऱ्या तरुणांवर हल्ला चढविला. हा सारा प्रकार पोलिसांच्यासमोर घडत असला तरी कन्नडीगांना पाठीशी घालण्याच्या नादात पोलिसांनी व्हिडिओ करण्याखेरची कोणताच पर्याय नव्हता. वाद चिघळल्याने अधिक तुकडी मागविण्यात आली. मात्र उलटा चोर कोतवाल को डाटे या म्हणीप्रमाणे व्यावसायिकांनाच मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.