वादग्रस्त पत्रकार राणा अय्यूब अडचणीत
न्यायालयाकडून एफआयआर नोंदविण्याचा आदेश : हिंदू देवतांच्या अवमानाचा मुद्दा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील एका न्यायालयाने वादग्रस्त पत्रकार राणा अय्यूब विरोधात धार्मिक भावनांना ठेच पोहोचविल्याप्रकरणी एफआयआर नेंदविण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे. साकेत न्यायालयाने पोलिसांना एफआयआर नोंदविण्याचा आदेश देत याप्रकरणी पोलिसांनी तपास करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी निर्देशानुसार राणा अय्यूबविरोधात कलम 153 अ, 295 अ आणि 505 अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे.
पत्रकार राणा अय्यूबकडून 2013-17 दरम्यान करण्यात आलेल्या कथित इंटरनेट मीडिया पोस्टप्रकरणी न्यायालयाने एफआयआर नोंदविण्याचा निर्देश दिला आहे. राणा अय्यूबच्या पोस्टमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप आहे.
न्यायालयाने पोलिसांना धार्मिक भावना दुखावणे आणि समुदायांदरम्यान शत्रुत्व निर्माण करण्याच्या आरोपांखाली एफआयआर नोंदविण्याचा निर्देश दिला आहे. तक्रारदार अमित सचदेव यांनी मागी लवर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमध्ये याप्रकरणी तक्रार नोंदविली होती. अय्यूबने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हिंदू देवतांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करत लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे. राणा अय्यूबच्या पोस्टमध्ये हिंदू देवतांचा अपमान, भारतविरोधी भावना फैलावणे अणि धार्मिक वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न सामील होता असा आरोप आहे.