For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अडकलेल्या भारतीयांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

06:57 AM Mar 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
अडकलेल्या भारतीयांसाठी नियंत्रण कक्ष स्थापन
Advertisement

परत आणण्याची योजना, दूतावासांच्याकडून संपर्क

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे अनेक भारतीयांना आखाती देशांमध्ये अडकून पडावे लागले आहे. त्यांना परत आणण्यासाठी भारताने व्यापक योजना सज्ज केली आहे. अडकलेल्या भारतीयांच्या साहाय्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाकडून स्थापन करण्यात आला आहे. तसेच भारतीय नागरिकांशी दूतावासांच्या माध्यमातून संपर्क करण्याचीही योजना आहे.

Advertisement

या युद्धाला आता पाच दिवस झालेले आहेत. मात्र, ते थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसून येत नाहीत. दोन्ही बाजूंकडून एकमेकींवर हल्ले केले जात आहेत. अशा स्थितीत भारत सरकारने आखाती देशांमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना परत आणण्यासाठी व्यापक योजना सज्ज ठेवली आहे. अडकलेल्या नागरिकांना कोणतीही समस्या आली तर त्यांनी या नियंत्रण कक्षाशी संपर्क केल्यास त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे.

पाच दूरध्वनी क्रमांक

या नियंत्रण कक्षाने पाच दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध केले असून त्यांचा उपयोग संपर्कासाठी आणि मार्गदर्शनासाठी केला जाऊ शकतो. या दूरध्वनी क्रमांकांखेरीज आखाती देशांमधील प्रत्येक दूतावासाने स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन दिले आहेत. विविध आखाती देशांमधील भारतीय दूतावास सातत्याने त्या देशातील आपल्या नागरिकांशी आणि त्या देशांच्या प्रशासनाशी संपर्कात आहेत. कोणतीही अडचण असल्यास संपर्क करण्यात यावा, असे आवाहन दूतावासांनीही केले आहे.

58 विमानफेऱ्या

अडकलेल्या भारतीयांना सुखरुप परत आणण्यासाठी बुधवारी 58 विमानफेऱ्या आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यांच्यातून साधारणपणे 7 हजार भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणण्यात आले आहे. दुबई आणि ओमान या दोन देशांनी बुधवारी काही काळ आपले वायुक्षेत्र प्रवासी विमानांसाठी मोकळे केले होते. मंगळवारीही एका विमानाने 149 प्रवाशांना परत आणण्यात आलेले आहे. अनेक विमान कंपन्यांनी तातडीची उपाययोजना म्हणून विमानांच्या आसनक्षमतेत वाढ केली आहे. तसेच, सर्व विमान कंपन्यांनी दूतावासांशी संपर्क ठेवलेला आहे. आज गुरुवारीही परिस्थिती अनुकूल असल्यास जवळपास 200 विमानफेऱ्या करुन जास्तीत जास्त भारतीयांना परत आणण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.

पर्यायी तेलपुरवठ्यासाठी योजना

भारताकडे एकंदर पन्नास दिवस पुरेल इतका कच्च्या इंधन तेलाचा साठा करण्याची व्यवस्था आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. भारताला होणाऱ्या तेलपुरवठ्यापैकी 40 टक्के साठा या मार्गाने येत असतो. तो मार्ग युद्ध थांबेपर्यंत उघडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भारताने पर्यायी तेलपुरवठ्याची योजना सज्ज केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. भारत पश्चिम आफ्रिका आणि व्हेनेझुएलाकडून तेल घेऊ शकतो. भारताला प्रतिदिन 40 लाख बॅरल तेल विकण्याची व्यवस्था केल्याचे विधान व्हेनेझुएला या देशाने केले आहे. व्हेनेझुएलात ज्या प्रकारचे कच्चे तेल मिळते, ते शुद्ध करण्याची व्यवस्था भारतात असल्याने ते तेल घेण्याची सुविधा भारताला आहे. याशिवाय काही पश्चिम आफ्रिकी देशही भारताला तेलपुरवठा करण्यास सज्ज आहेत, अशी माहिती देण्यात येत आहे.

तेलदरात वाढ

युद्धास प्रारंभ झाल्यानंतर पाचव्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलदरात वाढ झाली आहे. आतापर्यंत ब्रेंट व्रूड तेलाचे दर 14 टक्के वाढले असून ते 80 डॉलर्सच्या घरात पोहचले आहेत. युद्ध लांबल्यास ते 100 ते 120 डॉलर्सपर्यंत पोहचतील, अशी शक्यता आहे. तसे झाल्यास भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

भारतीयांना साहाय्यता

ड आखाती देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना साहाय्यता करण्याची योजना

ड अनुकूल परिस्थिती असल्यास प्रतिदिन 200 प्रवासी विमानफेऱ्या होणार

ड तेलपुरवठा सुरळीत राखण्यासाठी भारताकडून पर्यायी स्रोतांची योजना सज्ज

Advertisement
Tags :

.