For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोमंतकीय मराठी महिला पत्रकारांचे योगदान व आव्हाने

06:27 AM Jun 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
गोमंतकीय मराठी महिला पत्रकारांचे योगदान व आव्हाने
Advertisement

समाजात सगळ्यात अधिक, पदोपदी आमिषे असणारे क्षेत्र म्हणजे पत्रकारिता. या आमिषांना बळी न पडणे हे पत्रकारितेसमोरचे फार मोठे आव्हान. स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत म्हटले होते, ‘अ रिअल जर्नालिस्ट बीकमस् किंगऑफ ऑल सेक्शन्स ऑफ सोसायटी.’ समाजातील जींवंत हिरे, मोती, माणके असणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांचा आदर्श समाजासमोर आपल्या लेखणीतून प्रकटीत करणे, हे आजच्या काळातील आव्हान आहे.

Advertisement

पुरुषांनी पत्रकारितेत उतरणे हे तसे धाडसच आहे, महिलांनी पत्रकारितेत उतरणे तर महाधाडसच! पत्रकारिता ही नोकरी नाही, व्यवसाय नाही. ते एक व्रत. आकांक्षा, जिद्द, मेहनत, नवीन शिकण्याची वृत्ती, अडचणी-संकटांना सामोरे जाण्याचे धाडस, सामाजिक दृष्टिकोन, थोडीशीतरी देशभक्ती देशप्रेम असली की पत्रकारितेच्या व्रताचे फळ नक्कीच मिळते. पत्रकारिता ‘ग्लॅमरस’ही आहे, पण त्यातील वाटचाल आगीत होरपळ्यासारखीच आहे. पण आकांक्षा पुढती गगन वाटे ठेंगणे. काहीतरी वेगळं करुन जगण्याला वेगळा अर्थ देणाऱ्यांना कोणू रोखू शकत नसतात. ते मग पुरुष असू द्या की महिला. अशा युवतींनी, महिलांनीही आज समाजाच्या सर्वच क्षेत्रात पदार्पपण केलेले आहे. पत्रकारितेत महिलांचे प्रमाण अगोदर कमी होते, तरी सध्या वाढू लागले आहे. गोव्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात आजच्या घडीला महिला पत्रकारांचे संख्यात्मक व गुणात्मकदृष्ट्या योगदान उल्लेखनीय आहेच.

गोमंतक साहित्य सेवक मंडळाने घेतलेले गोव्यातील पहिले मराठी पत्रकार संमेलन यशस्वी तसेच ऐतिहासिक ठरले. मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांच्या कल्पनेतून साकारलेले हे संमेलन गोव्यातील महिला पत्रकारांना पुढीची दिशा, उर्जा देणारे ठरले. महिला पत्रकारांच्या योगदानाचा आपण विचार करतो तेव्हा पूर्णवेळ वार्ताहर किंवा प्रतिनिधी, उपसंपादक, पुरवणी संपादक इथपर्यंतच माहिलांची मजल का जाते? महिला पत्रकारांना सांस्कृतिक प्रतिनिधीपदावरच ठेवले जाते. अलीकडे काही युवती ‘क्राईम बीट’, वाणिज्य प्रतिनिधीपदाची जबाबदारी सांभाळतात. हे सारं काही असलं तरी संपादकपदापर्यंत त्या का पोहाचत नाहीत? पत्रकारितेतील सगळ्या क्षमतांवरुन महिला योगदान देत आहेत, संपादक होण्याचीच क्षमताच त्यांच्यामध्ये नाही काय? की राजकारण, अर्थकारण, कायदे व चालू घडामोडी, किंवा अचानक गरज पडते तेव्हा शिघ्रलेखन करण्यात महिला मागे पडतात? याबाबत सार्वजनिक विचारमंथन होणे आवश्यक आहे. आगामी काळात महिला संपादकपयदापर्यंत पोहोचतील आणि महिला पत्रकारांची संख्याही वाढेल. मागील काही वर्षांत सुहासिनी प्रभुगावकर यांनी आपल्या बहुआयामी पत्रकारितेद्वारे स्वत:चा वेगळा ठसा उमटवलेला आहे. लीना पेडणेकर, अपूर्वा ग्रामोपाध्ये, कालिका बापट, यती लाड, पूजा नाईक यांनी चांगले योगदान दिले आहे. मध्यतंरीच्या काळात अनेक युवतींनी पत्रकारितेत पदार्पपण केले, पण त्या टिकल्या नाहीत. त्यांनी एक तर सरकारी नोकऱ्या स्वीकारल्या किंवा घरीच बसल्या. सध्या कालिका बापट, मनस्विनी प्रभुणे नायक, कविता आमोणकर, यामिनी मडकईकर, सपना सामंत, पूजा नाईक, प्रज्ञा मणेरीकर, श्रमी भोंसुले, स्रिग्धरा नाईक, रिमा केसरकर, प्रीती मराठे, गायत्री हळर्णकर, अमिता सावंत, अंकिता गोसावी, काव्या पोवार या मराठी महिला पत्रकार असून काहीजणी 20 ते 25 वर्षांपासून कार्यरत आहेत. विविध कॉलेजमधून पत्रकारिता अभ्यासक्रम शिकणाऱ्या युवतींची संख्या वाढत असून त्या पुढे प्रत्यक्ष पत्रकारितेत उतरतील आणि योगदान देतील.

Advertisement

मुळात महिला असल्याने महिला पत्रकारांसमोर अगोदरच खूप आव्हाने असतातच. पण त्या आव्हानांना सामोरे जाण्याचे धाडस ज्या महिलांमध्ये असते, त्याच महिला पत्रकरितेत उतरतात. घर सांभाळून पत्रकारिता करताना अनेक आव्हानांना समोरे जाऊन पत्रकारिता करावी लागते, ती पारंपरिक आव्हाने आहेतच, पण त्याचबरोबर बदलत्या काळामुळे अनेक नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. ही आव्हाने म्हणजे कौशल्याबाबतची, समर्पितपणाची, मेहनतीची, त्यागाची आव्हाने आहेत. महिला पत्रकारांना गोव्यात किमान कोंकणी, मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषा चांगल्याप्रकारे अवगत असायला हव्यात. पत्रकाराकडे बहुभाषिक कौशल्य हवेच. भाषांचे व्याकरण तर आवश्यक आहेच, त्याचबरोबर स्वत:ची ओळख निर्माण करणारी लेखनशैली असणे हे आव्हानच. सहज, सरळ, सोपा तसेच प्रभावी अनुवाद करता आला पाहिजे. त्याला गुगल ट्रान्सलेटर पर्याय चालत नाही. त्याचे अनुवादित शब्द अनाकलनीय, संदर्भहीन, अनर्थ घडविणारे असतात. अफाट सर्वसाधारण ज्ञान पत्रकाराच्या लेखनाला विश्वासपूर्ण ठरवते. हे ज्ञान मूळ स्रोतांतून घ्यायला हवे. भारतीय संविधान संपूर्णपणे आकलन करुन घ्यावेच लागेल. आपण वकिल किंवा ज्ञानायाधीश नसलो तरी कायदे, कायद्यांतील दुरुस्त्या व नव्या कायद्यांची माहिती नसल्यास तुम्ही मागे रहाल. राजकारणाच्या माहितीवर पूर्ण ‘कमांड’ असावा लागतो. एकाच राजकीय पक्षाचे गुलाम होऊन चालणार नाही. दुसऱ्यांसमोरचे कुत्रे बनून चालणार नाही. राजकारण्यांच्या पत्रकार परिषदा नुसत्या ऐकून भागणार नाही, त्यांना सडेतोड पण संयुक्तिक प्रश्न विचारुन आपली बातमी, लेख अधिक प्रभावी करणे हे आव्हान असते. समाजाचे, राज्याचे, देशाचे अन् पुढे जगाच्या अर्थकारणाचा अभ्यास सुद्धा आव्हानात्मकच. इतिहासाचे ज्ञान हे आव्हान न पेलल्यास पत्रकाराची फजिती होते. भूगोल, खगोलाची माहिती हवी. आधुनिक तंत्रज्ञानाशी मैत्री जोडल्यास पत्रकारिता आणखी बहरते. पत्रकार हा डॉक्टर, वकील, संशोधक, चित्रकार, कलाकार, शेतकरी, कारखानदार, सैनिक असा कोणीही नसतो, तरी ज्ञान मिळविण्याचे आव्हान पेलल्यास पत्रकार सर्व क्षेत्रांचा राजा बनू शकतो. स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत म्हटले होते, ‘अ रिअल जर्नालिस्ट बीकमस् किंग ऑफ ऑल सेक्शन्स ऑफ सोसायटी’. समाजात सगळ्यात अधिक, पदोपदी आमिषे असणारे क्षेत्र म्हणजे पत्रकारिता. या आमिषांना बळी न पडणे हे पत्रकारितेसमोरचे फार मोठे आव्हान. गुंड, बलात्कारी, खुनी, दुष्ट, देशद्रोहींच्या पाठीमागे धावण्यापेक्षा पत्रकारांनी समाजातील जींवंत हिरे, मोती, माणके असणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांचा आदर्श समाजासमोर आपल्या लेखणीतून प्रकटीत करणे, हे आजच्या काळातील आव्हान आहे. शोध पत्रकारिता करणे, हे आव्हान पेलणारे पत्रकार आपला स्वतंत्र ठसा उमटवितात. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचे आव्हान स्वीकारावे लागेल. अशी अनेक आव्हाने पेलून गोव्यातील मराठी महिला पत्रकार गोव्याच्या पत्रकारितेला आगामी काळात नवा आयाम देतील, असा विश्वास आहे.

राजू भिकारो नाईक

Advertisement
Tags :

.