ग्रामीण भागातील महिलांचे रोजगारात योगदान वाढले
ग्रामीण भागातील महिला काम करण्यासाठी आपले अधिकचे योगदान देत आहेत, असे दिसून आले आहे. अलीकडच्या प्रसिद्ध झालेल्या एका अहवालामध्ये ग्रामीण भागातील महिलांचा वाटा रोजगाराच्या बाबतीमध्ये वाढलेला दिसून आला आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे बिहार या राज्याने मोठे योगदान दिलेले आहे. बिहारमधील महिला रोजगारात जास्तीत जास्त सहभाग दर्शवत असल्याचे चित्र आहे. सरकारच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ उठवत महिलांनी रोजगारामध्ये आपली महत्त्वाची भूमिका निभावली आहे. या तुलनेमध्ये शहरी भागामध्ये केवळ 24 टक्के महिला रोजगारामध्ये सहभागी झाल्या आहेत. 2017-18 वर्षी हे प्रमाण 20 टक्के होते. 2017-18 या वर्षामध्ये ग्रामीण भागातील महिलांची रोजगारामध्ये हिस्सेदारी 24 टक्के इतकी होती जी वाढून 2022-23 या वर्षात 41 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. यावरुन विविध रोजगाराच्या क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान त्यातही ग्रामीण भागातून वाढताना दिसत आहे. ही एक आश्वासक बाब भारताच्या रोजगाराच्या योगदानामध्ये मानली जात आहे.
गेल्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये रोजगाराच्या बाबतीमध्ये पाहता महिलांचे प्रमाण बिहारमध्ये अधिक वाढलेले आहे. ही वाढ 497 टक्के इतकी विक्रमी अशी दिसून आली आहे. बिहार या राज्याचे याबाबतीत कौतुक करावे तेवढे थोडे आहे. एकेकाळी या राज्यात विकास नावाला नव्हता. पण अलीकडच्या काही वर्षामध्ये बिहार राज्याचा नव्या नेतृत्वाने चेहरा बदलला आहे. मनरेगासह विविध रोजगार देणारे उपक्रम बिहारमध्ये राबवले जात आहेत. ग्रामीण भागातील महिलांचा रोजगार एकीकडे वाढताना या तुलनेमध्ये शहरी भागातील महिलांचा सहभाग हा कमी पहायला मिळत आहे. शहरी भागातील महिलांची रोजगारातील टक्केवारी खरे तर वाढायला हवी. याबाबतीत आता केंद्राने पुढाकार घ्यायला हवा. मुद्रा योजना, ड्रोन दिदी योजना आणि स्वयंसहाय्य समुहाच्या योजना यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये महिलांची भागिदारी लक्षणीयरित्या वाढलेली आहे.
मोठ्या राज्यांचा विचार करता झारखंड राज्यामध्ये रोजगाराचे प्रमाण महिलांच्या बाबतीमध्ये 233 टक्के वाढलेले आहे. पश्चिम बंगालमध्ये हेच प्रमाण 84 टक्के वाढलेले आहे. पारंपरिकरित्या पाहता बिहार, पंजाब आणि हरियाणा या राज्यांचाही वाटा नोंदणीय आहे. पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये महिला रोजगाराचे प्रमाण अनुक्रमे 105 टक्के, 43 टक्के इतके पहायला मिळाले आहे. हे प्रमाण 2017-18 च्या तुलनेमध्ये 2022-23 मध्ये पहायला मिळाले. बिहारमध्ये महिला कामगारांची संख्या याच कालावधीत सहापटीने वाढलेली दिसली आहे. ही वाढ टक्केवारीमध्ये पाहता 497 टक्के इतकी भरते. यावरुन या राज्याची रोजगाराच्याबाबतीत कामगिरी नोंद घ्यावी अशीच म्हणावी लागेल. इतर राज्यांतील ग्रामीण महिलांनी या राज्याचा आदर्श घ्यायला हरकत नसावी. एकीकडे हे असे सकारात्मक चित्र असताना काही राज्यांमध्ये महिलांची रोजगारात संख्dया वाढताना दिसत नाही. गोवा आणि केंद्रशाषीत प्रदेश लक्षद्विप या ठिकाणी मात्र महिला कर्मचाऱ्यांची संख्या घटलेली दिसून येत आहे. साक्षरतेच्या बाबतीमध्ये आघाडीवर असणाऱ्या केरळ राज्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या हळुहळू अलीकडच्या काळामध्ये घटताना दिसत आहे. या कामगारांच्या बाबतीमध्ये महिलांचा सहभाग वाढण्यामध्ये काहीवेळा त्यांच्या वैयक्तिक अडचणी कारणीभूत ठरत असतात, असेही दृष्टीपथात आलेले आहे. लग्न आणि लग्नानंतर मुले झाली की बऱ्याच महिला अर्ध्यावरच काम सोडतात. परिणामी वर्षाच्या आधारावर पाहता रोजगारातील महिलांची संख्या कमी जास्त होत असते. 2022-23 वर्षात रोजगार क्षेत्रात महिलांचे एकंदर योगदान हे 37 टक्के इतके नोंदले गेले आहे. सरकार आपल्यापरीने विविध क्षेत्रात महिलांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न करत असते.