हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचं योगदान काय ? नारायण राणेंचा शंकराचार्यांना परखड सवाल
२२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात पार पडणाऱ्या प्रभु रामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला देशातील चारही शंकराचार्यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थिवर देशभरामध्ये चर्चा होत आहेत. शंकराचार्यांच्या नाराजीवर आज केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी शंकराचार्यांचं हिंदू धर्मासाठी काय योगदान आहे यांची विचारणा केली.
राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी देशभरात निमंत्रणे पाठवली जात आहेत. देशातील महत्वाच्या नेत्यांसह विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तिंनाही निमंत्रणे पाठवली गेली आहे. हिंदू धर्माची चार शक्तीपीठ असणाऱ्या पीठांच्या शकराचार्यांनी मात्र या कार्यक्रमाला येण्यास नकार दिला असून त्यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनांवरून नाराजी प्रकट केली आहे.
त्यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या असून भाजपचे नेते आणि केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते आज वसई विरारमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले. "देशामध्ये प्रभु रामांचे मंदिर एवढ्या वर्षांनंतर होत आहे, त्याचं कुठलंच कौतूक नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसेच भारतीय जनता पक्षाने हा विषय हाती घेतला आहे. त्यामुळे शंकराचार्यांनी नविन होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की त्यावर टीका करावी ?" असा प्रश्न केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, "विरोध करणारे शंकराचार्य हे भाजपाला व पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत. राम मंदिराच्या प्रतिष्ठापणेचा कार्यक्रम हा राजकीय नसून धार्मिक आहे. प्रभु राम आमचं दैवत असून त्याचसाठी मंदिर उभारलं जात आहे. मंदिराच्या प्रतिष्ठापणेला विरोध करणाऱ्या शंकराचार्यांनी त्यांच्या जीवनातील हिंदू धर्मासाठीचं योगदान सांगावं.” असा परखड सवाल नारायण राणे यांनी शंकराचार्यांना विचारला आहे.