अयोध्या राम मंदीर उभारणीत पेंडूर गावचा खारीचा वाटा
कट्टा / वार्ताहर
संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या येथील राम मंदिराचा लोकार्पण शुभारंभ सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत केला जाणार आहे. याच अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र यांच्या राम मंदिर उभारणीसाठी देशभरातून अनेक जिल्हे, तालुके, गावे यांचा मोलाचा सहभाग आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका येथील पेंडूर या गावाने देखील खारीचा वाटा उचलला आहे. मंदिर उभारणीचा शुभारंभ झाला त्यावेळी पेंडूर गावच्या वतीने गावातील गणपती मंदिर (पेंडूर नाका) येथे विधीवत पूजन केलेली एक वीट १९८९ साली कारसेवकांमार्फत अयोध्या येथे पाठविली होती. गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक शामसुंदर केळुसकर यांनी या कामी पुढाकार घेतला होता. सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाने अयोध्या येथे राममंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रबळ इच्छा शक्ती आणि जगातील तमाम श्रीराम भक्त यांच्या श्रद्धेतून श्रीराम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा येत्या २२ डिसेंबरला संपन्न होत आहे.२.७ एकर एवढ्या क्षेत्रफळावर उभारण्यात आलेल्या मंदिराची लांबी ३६० फूट असून रूंदी २३५ फूट आहे कळसासह उंची १६१ फूट असून मंदिर तीन मजली आहे.१९८९ च्या सुमारास देशभरातील कारसेवकांच्या माध्यमातून श्रीराम लिहीलेल्या वीटा अयोध्येला पाठविण्यात आल्या होत्या. यामध्ये मालवण तालुक्यातील पेंडूर गावचा देखील समावेश होता. पेंडूर गाव हे आराध्य दैवत श्री देव वेताळ व श्री देवी सातेरी यांच्या आशीर्वाद व वास्तव्याने पावन झालेला गाव आहे. त्याचबरोबर लिंगेश्वर, रवळनाथ, पावणाई, महापुरुष आदी देवालये गावात आहेत. गावाला पूर्वंपार असा देव देवतांचा वारसा लाभल्यामुळे गावचा इतिहास श्रध्दापूर्वक आहे . त्यामुळे अयोध्या श्रीराम मंदिर उभारणी या महान कार्यासाठी गावातील ज्येष्ठ शामसुंदर केळुसकर यांनी पुढाकार घेऊन वीट पूजनाचा मंगल विधी पेंडूर गावातील प्रसिद्ध पुरोहित नंदू नातू यांच्या पौरोहित्यखाली पेंडूर नाक्यावर असलेल्या श्री गणपती मंदिरामध्ये संपन्न झाला होता. शामसुंदर केळुसकर व त्यांचे सहकारी यांनी गावामधून प्रत्येक घरातून 1 ते 2 रुपये याप्रमाणे वर्गणी देखील त्याकाळी गोळा केली होती.या पवित्र कार्यासाठी बाबाराव राणे, बबन साटम, संतोष राऊळ ,श्रीधर पालव, पपू राणे कुटुंबीय यांच्यासह अनेक रामभक्तांनी सहकार्य केले.अशा या बहुचर्चित असलेल्या राम मंदिर उभारण्यात पेंडूर गावातील लोकांनी बजावलेली भूमिका दिलेले योगदान निश्चितच मालवण तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.