For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशाच्या रक्षणाबरोबरच राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान द्या

11:03 AM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
देशाच्या रक्षणाबरोबरच राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान द्या
Advertisement

ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये 560 अग्निवीरांचा दीक्षांत समारंभ : अग्निवीरांचे शिस्तबद्ध पथसंचलन

Advertisement

बेळगाव : कठोर परिश्रमाला पर्याय नसतो. जिद्द, चिकाटी, अथक मेहनतीच्या बळावर मराठा लाईट इन्फंट्रीमधून अग्निवीर देश रक्षणासाठी सज्ज झाले आहेत. या अग्निवीरांबद्दल माझ्याप्रमाणेच त्यांच्या पालकांना आणि समस्त भारतीयांना अभिमान वाटतो आहे. देश रक्षणाबरोबरच राष्ट्रनिर्मितीसाठी तुम्ही योगदान द्यायचे आहे, याचे भान कायम ठेवा, अशा शब्दात इन्फंट्रीचे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी अग्निवीरांना मार्गदर्शन केले. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमधून 31 आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 560 अग्निवीरांचा दीक्षांत समारंभ मंगळवारी सकाळी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व तितक्याच दिमाखात पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने अग्निवीरांना मार्गदर्शन करताना जॉयदीप मुखर्जी बोलत होते.

ते म्हणाले, आज अग्निवीरांच्या गणवेशात तुम्हाला पाहून मला अभिमान वाटत आहे. अनेक आव्हानांना तुम्ही नीडरतेने सामोरे गेला आहात. आज भारतीय सेनेसाठी हा अत्यंत महत्त्वाचा किंबहुना सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याचा दिवस आहे. कारण संपूर्ण देशात एकाच वेळी हजारो अग्निवीर देशरक्षणाची, देशाच्या एकतेची शपथ घेत आहेत. अग्निवीर प्रशिक्षणार्थी म्हणून तुम्ही येथे आलात आणि हे प्रशिक्षण किती कठोर असते, याची मला कल्पना आहे. परंतु तुम्ही ते पूर्ण केले. तुमच्यातील जिद्द, कष्ट करण्याची तयारी यामुळे येत्या काळात तुम्ही सच्चे अग्निवीर म्हणून आपल्या राष्ट्रासाठी योगदान द्याल. मराठा रेजिमेंटच्या अनेक लढायांमध्ये आपल्या पूर्वजांनी देशभक्तीचे अप्रतिम दर्शन घडवून रेजिमेंटची वैभवशाली परंपरा कायम राखली आहे. हाच वारसा तुम्ही पुढे चालवाल, अशी अपेक्षा ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी व्यक्त केली. प्रारंभी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्निवीरांनी वाद्यवृंदांच्या तालावर शिस्तबद्ध पथसंचलनाद्वारे पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यानंतर भारतीय लष्करात दाखल होणाऱ्या अग्निवीरांना राष्ट्रध्वज आणि रेजिमेंटच्या ध्वजाच्या साक्षीने देश संरक्षणाची शपथ देण्यात आली.  उत्कृष्ट कामगिरीबद्दल अग्निवीरांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी अग्निवीरांचे पालक, वरिष्ठ लष्करी अधिकारी व निमंत्रित उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.