For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कंत्राटदाराची बेपर्वाई, मजुराचा गेला बळी

03:24 PM May 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
कंत्राटदाराची बेपर्वाई  मजुराचा गेला बळी
Advertisement

सुदैवाने तिघेजण सुरक्षितपणे बचावले : हार्बर मुरगाव महामार्गावरील दुर्घटना

Advertisement

वास्को : हार्बर मुरगाव येथील महामार्गावर दरड कोसळून त्यात एक मजूर गाडला जाण्याची घटना सोमवारी दुपारी घडली. मातीच्या ढिगाऱ्याखालीच त्याला मृत्यू आला. या घटनेत एक मजूर किरकोळ जखमी झाला, तर अन्य दोघेजण सुरक्षितरित्या बचावले. मयत मजुराचे नाव मनोरंजन बिंद (45) असे आहे. झारखंडमधून आलेल्या काही मजुरांसोबत तो काम करीत होता. मुरगाव पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. डोंगर कापणीत निष्काळजीपणा केल्यामुळे संबंधित कंत्राटदार व पर्यवेक्षक या दोघांविरोधात मुरगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

सोमवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास ही घटना घडली. हेडलॅण्ड नाका ते हार्बरपर्यंतच्या महामार्गावर एका ठिकाणी डोंगराच्या कडेला संरक्षक भिंत उभारण्याचे काम करण्यात येत आहे.  संरक्षक भिंत आणि रस्ता रुंदीकरण असे हे काम असून ते मागच्या वर्षभरापासून चालू आहे. मात्र, हे काम धोकादायक पद्धतीने करण्यात येत असल्याचे दिसत आहे. याच धोकादायक पद्धतीच्या कामामुळे या मजुराचा बळी गेला. डोंगराची कडा कापलेल्या ठिकाणी एकूण चार मजूर काम करीत होते. अचानक दरड त्यांच्यावर कोसळली. दोघांनी पळ काढला. मनोरंजन हा त्या दरडीखाली गाडला गेला तर एकटा किरकोळ जखमांवर बचावला. ढिगाऱ्याखाली गाडला गेलेल्या मजुराला शोधून बाहेर काढण्यासही बराच वेळ गेला. त्याला ढिगाऱ्याखालीच मृत्यू आला.

Advertisement

आठवडाभरात काम पूर्ण करा

डोंगर कोसळून थेट महामार्गावर आल्याने या महामार्गावरील वाहतूकही बंद झाली. मात्र, वाहतुकीची गैरसोय टाळण्यासाठी युद्धपातळीवर काम करून रस्ता मोकळा करण्यात आला. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी तेथील परिस्थितीची पाहणी केली. संरक्षक भिंतीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण न झाल्यास त्या महामार्गावर पुन्हा दरड कोसळण्याचा धोका असल्याचे दिसून आल्याने त्यांनी सदर काम पुढील आठवडाभरात पूर्ण करण्याची सूचना केली आहे. आमदार संकल्प आमोणकर व उपस्थित अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली.

कसून चौकशी करावी : विरियातो

खासदार विरियातो फर्नांडिस यांनी या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. कामावेळी सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली नाही. हलगर्जीपणामुळेच अशा घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत. दरडी कोसळलेल्या भागाकडे पाहिल्यास अद्यापही धोका भेडसावत असल्याचे ते म्हणाले.

जारी केला होता धोकादायक स्थितीचा व्हिडियो

दरम्यान, मुरगावचे माजी नगरसेवक नीलेश नावेलकर यांनी संरक्षक भिंतीसाठी कापण्यात आलेल्या डोंगरामुळे धोका असल्याची भिती जाहीरपणे दोन दिवसांपूर्वीच व्यक्त केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर धोक्याबाबत आपण सोशल मीडियावर व्हिडियो जारी केला होता. सदर काम करणाऱ्यांना, अभियंत्यांना भेटून धोक्याची कल्पनाही दिली होती. त्यानंतर अधिकृतरित्या त्यांच्यासमवेत पाहणीही करण्यात आली होती. मात्र, तरीही धोका दूर करण्यात आला नाही. अखेर एका मजुराचा बळी गेला, असे ते म्हणाले.

डोंगर कापण्याच्या धोकादायक पद्धतीमुळे दुर्घटना

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तो ढिगारा हटवण्यास प्रारंभ केला. आमदार संकल्प आमोणकर तसेच जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस, खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, उपजिल्हाधिकारी, मामलेदार, पोलिस अधीक्षक गुरूदास कदम, इतर पोलिस अधिकारी व इतर शासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रविवारी रात्री काही प्रमाणात पाऊस पडल्याने पाणी साचून सदर दरड कोसळली, असे सांगण्यात येत आहे. संरक्षक भिंत उभारण्यासाठी डोंगर कापण्याचे काम अत्यंत धोकादायक पद्धतीने व कोणतीही खबरदारी न घेता करण्यात येत असल्याचे दिसून आल्याने या घटनेला सदर काम करणारा कंत्राटदार सध्या लक्ष्य झालेला आहे.

घटनेला कंत्राटदार सर्वस्वी जबाबदार

या दुर्घटनेसंबंधी स्थानिक आमदार संकल्प आमोणकर यांनी खेद व्यक्त करून या घटनेला कंत्राटदार सर्वस्वी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. सदर काम धोकादायक आहे. एखादी दुर्घटना घडू शकते असा धोक्याचा इशाराही आपण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना त्यांच्याशी बैठक घेऊन दिला होता. त्या डोंगराची अनेकवेळा आपण पाहणीही केली होती. कंत्राटदाराने सदर काम गेले वर्षभर रखडत ठेवलेले आहे. कामाची पद्धतही धोकादायक आहे. सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली नाही. योग्य खबरदारी न घेतल्यास पावसात पुन्हा धोका निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

-आमदार संकल्प आमोणकर

Advertisement
Tags :

.