Kolhapur News: ठेकेदाराकडून मनपाला 30 कोटींचा चुना, शिंदे गटाच्या शिष्टमंडळाचा आरोप
चौकशी करुन संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली
कोल्हापूर : गॅस पाईपालाईनच्या खोदाईमधूनच ऑप्टिकल केबल टाकत संबंधित ठेकेदार कंपनीने महापालिकेला सुमारे 30 कोटींचा चुना लावल्याचा आरोप शिवसेना शिंदेगटाच्या शिष्टमंडळाने केला. शहरात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाईची परवानगी घेतलेल्या संबंधित ठेकेदार कंपनीने यासोबतच ऑप्टिकल फायबर केबलही टाकली आहे. वास्तविक ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी खोदाईचे स्वतंत्रपणे महापालिकेकडे पैसे भरणे आवश्यक होते.
याप्रकरणाची चौकशी करुन संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडे केली. शिवसेना शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली शहरातील विविध प्रश्नांबाबत प्रशासक मंजूलक्ष्मी यांची भेट घेतली.
यावेळी शिष्टमंडळाने गॅस पाईपलाईन खोदाईच्या परवानगीमधून ऑप्टिकल केबलचे काम सुरु असल्याचे सांगत संबंधित ठेकेदाराकडून महापालिकेची कशा पद्धतीने फसवणूक सुरु आहे, हे प्रशासक यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
शहरात पाईपलाईन टाकणे यासह अन्य कोणत्याही कामासाठी खोदाई करायची असल्यास संबंधित कंपनी, ठेकेदार यांना प्रति कि. मी. साधारण 75 लाख रुपये महापालिकेकडे भरावे लागतात. सध्या गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाईचे पैसे संबंधित कंपनीने महापालिकेकडे भरले आहेत.
ई वॉर्डमध्ये त्यांचे काम सुरु आहे. मात्र यासोबतच ऑप्टिकल फायबर केबलही टाकण्यात येत आहे. याकामाचे स्वतंत्रपणे पैसे भरणे अपेक्षित होते. मात्र या कामाचे संबंधित कंपनीने पैसेच भरलेले नाहीत. सुमारे 30 ते 40 कि. मी. केबल टाकण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेचे सुमारे 30 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे शिष्टमंडळाकडून बैठकीत सांगण्यात आले.
बस डेपोसाठी उपनगरात मोकळ्या जागांचे सर्व्हेक्षण करा, अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. आता सर्किट बेंचही सुरु होत आहे. त्यामुळे पार्किंगसाठी जागा आरक्षित करावी. उपनगरात क्रीडांगणासाठी जागा आरक्षित करावी. उपनगरातील मंजूर फायनल लेआऊटमधील ओपन स्पेस महापालिकेच्या ताब्यात नाहीत. त्यामुळे ओपन स्पेस विकसित करताना अडचणी निर्माण होत आहेत.
ओपन स्पेस ताब्यात घेण्यासाठी मोहीम हाती घ्यावी. तसेच उपनगरात भाजी मंडई, स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित करावी. सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, शहरातील प्रमुख ठिकाणी सीसीटिव्ही यंत्रणा उभारण्यासाठी तरतूद करावी, स्ट्रिट लाईट देखभाल अभावी बंद आहेत. शासनासोबत पत्रव्यवहार करुन एलईडी धोरण निश्चित करावे, अशा विविध मुद्यांवर चर्चा झाली.
यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी नगरसेवक संभाजी जाधव, अश्विनी बारामते, अभिजित चव्हाण, दिगंबर फराकटे, रिना कांबळे, सचिन मोहिते, जहाँगिर पंडत, संजय सावंत, रशिद बारगिर आदी उपस्थित होते.