जिल्ह्यात संततधार
कोल्हापूर :
मॉन्सूनपूर्व पावसाची गुरुवारी रिपरिप राहिली.यामुळे ओढे-नाले भरुन वाहू लागले आहेत. रस्त्यांना तर ओढयाचे स्वरुप आले आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होत आहे.रात्री दहा वाजता पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा येथे 15 फूट 5 इंच इतकी पाणीपातळी होती.
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस होत आहे. मंगळवारी जिल्ह्यात मोठा पाऊस झाला. त्यानंतर बुधवारीही पावसाने हजेरी लावली. तर गुरुवारी पावसाने दिवसभर उसंत घेतली नाही. सकाळी पावसाची रिपरिप होती. पण त्यानंतर दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. या पावसामुळे मे महिन्यातच पावसाळी वातावरण झाले आहे.
पावसामुळे शहरात दाणादाण उडाली आहे. नवीन केलेल्या रस्त्यांची उंची वाढल्यामुळे घरात पाणी शिरत आहे. शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे या पाण्यातून वाहतूक करताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग नसल्याने पाणी तुंबून राहत आहे. मॉन्सूनपूर्व पावसात अशी अवस्था आहे तर पावसाळयात शहराचे काय होईल अशी विचारणा नागरिकांतून होत आहे.
ओढे-नाले भरुन वाहू लागले असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. रात्री दहा वाजता राजाराम बंधाऱ्यावर 15 फूट 5 इंच इतकी पाणी पातळी होती. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरुच होता.
- छत्री,रेनकोट बाहेर निघाले
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात सतत पाऊस पडत आहे. यामुळे छत्री, रेनकोटशिवाय घराबाहेर पडणे अशक्य आहे. गुरुवारी तर दिवसभर रिपरिप होती.यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी छत्री, रेनकोटचा वापर केला. जुन्या छत्र्या दुरुस्त केल्या जात आहेत. तसेच पावसाळी साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे.