सततच्या पावसाने खरीप पेरण्या लांबणीवर
विहे :
मे महिन्याच्या तोंडावर वळीव पावसाने सुरुवात केली तो बंद झालाच नाही. त्यामुळे कराड- पाटण तालुक्यातील खरिपाच्या पेरण्या रखडलेल्या आहेत. जुलैचा पहिला पंधरवडा संपला तरी पाटण तालुक्यात फक्त ३५ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. पावसाची रिपरिप सुरू असल्याने पेरणीसह शेतीच्या आंतर मशागतीस अडथळा येत आहे. पेरण्या लांबल्या असून ग्रामीण भागात हुकमी भात लागणीला भर दिल्याचे दिसत आहे. वन्यप्राण्यांच्या उपद्रव्यामुळे पिकांची नासाडी होत असल्याने चालूवर्षी उत्पन्नात घट होणार असून शेतकरी वर्ग चिंतेचे वातावरण आहे.
चांगले पर्जन्यमान असलेल्या पाटण तालुक्यात यावर्षी पावसाने चांगलीच पंचाईत केली आहे. मे महिन्यात वळीव स्वरूपात सुरू झालेला पाऊस जुलै महिना निम्मा होऊन देखील अजूनही उघडला नाही. त्यामुळे पेरणीची कामे रखडलेली आहेत. पावसाचे प्रमाण असले तरी चालू हंगाम वाया जाऊ नये म्हणून शेतकरी आपल्या पेरण्या उरकण्यावर भर देत आहेत. मात्र त्याला यश येत नाही. तालुक्यात आत्तापर्यंत सुमारे १९ हजार ३६१ हेक्टर क्षेत्रावर हंगामातील खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र गतवर्षीच्या तुलनेने ही आकडेवारी फारच कमी असून एकूण क्षेत्राच्या केवळ ३५ टक्केच पेरण्या आटोपण्यात आल्या आहेत.
कोयना धरण परिसरासह तालुक्यात इतरत्र पावसाची रिपरिप सुरू आहे. तर काही ठिकाणी पावसाची उघडझाप सुरू असल्याने तेथे पेरण्या सुरू आहेत. मात्र पेरणी पूरक शेत तयार नसल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी अडचणी येत आहेत. शेतात पाणी साचून राहिल्याने तण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तर यापूर्वी पेरणी झालेली पिके पिवळी दिसू लागली आहेत. तसेच सततच्या पावसाने पिके कुजून जाण्याचीही भीती शेतकरी वर्गातून वर्तवली जात आहे. पाटण तालुक्यात सरासरी ७७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शिवारासह नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. तर शेतात पाणी साचू लागले. उभ्या पिकांना पावसाच्या पाण्याचा फटका बसतो. पिके पाण्याखाली गेल्याने कुजतात. यामुळे रोप लागवड खोळंबली होती. गेले चार-पाच दिवस पावसाची उघडझाप सुरू असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसह रोप लागवडीवर जोर दिला आहे. भातरोप लागवडीचा हंगाम साधण्यास शेतकऱ्यांना मदत झाली आहे. भात रोप लागवडीसाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. पॉवर टिलरच्या माध्यमातून शेतकरी चिखल करून रोपलागवड करतात. एकमेकांना मदत करून रोप लागवड करण्यात येत आहे.
- हंगाम संकटात
डोंगर दऱ्यांनी व्याप्त पाटण तालुका कृषिप्रधान भाग असून इथल्या शेतकऱ्यांचे जीवन संपूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम दरवर्षी संकटात सापडताना दिसतो. कधी पाण्याची टंचाई तर कधी अतिवृष्टी या दोन्ही टोकांच्या घटनांनी शेतकऱ्यांची झोप उडवली आहे.
- केवळ ३५ टक्के पेरणी
पाटण तालुक्यात केवळ ३५ टक्के पेरणी
भात, सोयाबीन, भुईमूग पिकांकडे शेतकऱ्यांचा कल
संततधार पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली
पेरणी केलेल्या पिकांचे वन्यप्राण्याकडून नुकसान