For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चार दिवसांपासून पावसाची संततधार

06:50 AM Jul 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
चार दिवसांपासून पावसाची संततधार
Advertisement

शेतकरी सुखावला : राकसकोप जलाशयात एका रात्रीत दीड फूट पाणी वाढले

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : आठ दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने गेल्या चार दिवसांपासून पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी तर अक्षरश: दिवसभर मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे नदी, नाले, जलाशयांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. बळीराजादेखील सुखावला असून शेतीच्या कामांना उधाण आले आहे.

Advertisement

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होत चालली आहे. सोमवारी राकसकोप जलाशयात 2464.70 इतका पाणीसाठा होता. मात्र एका रात्रीत तब्बल 1.2 फुटाने पाणीपातळी वाढली आहे. जलाशय भरण्यास 9.6 फूट पाण्याची गरज आहे. मंगळवार दि. 21 रोजी सकाळपर्यंत राकसकोप जलाशयात 2465.90 फूट पाणीसाठा होता. जलाशयाची एकूण पाणी साठवण्याची क्षमता 2475.50 फूट आहे.

दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सूनला सुरुवात होते. मात्र यंदा जून महिन्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे सर्वांनाच चिंता लागून राहिली होती. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली. पण पावसाने दडी मारल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. पण आठ दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. चार दिवसांपासून पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जलाशयांच्या पाणीपातळीत वाढ होण्यासह नदी-नाले पुन्हा एकदा प्रवाही झाले आहेत.मंगळवारच्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेवरही परिणाम झाला. सध्या रोप लागवडीच्या कामांची धांदल उडाली आहे. त्यामुळे बांधावर शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.

Advertisement
Tags :

.