संततधार पावसाचा शेती बागायतीला मोठा फटका
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम : आज मुसळधारसह जोरदार वारे वाहण्याची शक्यता
पणजी : गोव्यात चालू ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंतचा 91 टक्के जास्त पाऊस झाला असून त्याचा फटका भात शेती तसेच बागायतीला बसला आहे. बंगलाच्या उपसागरातील चक्रीवादळ व अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा याचा परिणाम म्हणून गोव्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. या ऑक्टोबर महिन्यात एकूण सरासरी 303 मि. मी. पाऊस पडला असून मुरगाव आणि पेडणे येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. काल बुधवारीही कमी अधिक प्रमाणातील पाऊस संततधारपणे चालू होता. आगामी 24 तासात असाच मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून काही ठिकाणी जोरदार वारे वहाण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
भातशेतीची मोठी नुकसानी
या पावसाचा भातशेतीला मोठा फटका बसला असून तेथे पाणी साचून राहिल्याने भात पिके नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले असून भरपाईची मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे. काही ठिकाणी भाताची कापणी करण्यात आली असून काही भागात कापणी बाकी आहे. पावसामुळे कापणी करायला मिळत नाही आणि कापणी केलेली भाताची कणसे पावसामुळे खराब होत असल्याची तक्रार शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. कृषी अधिकाऱ्यांनी पहाणी करून अहवाल दिल्यानंतरच एकूण नुकसानीचा अंदाज येणार असल्याचे कृषी खात्याचे म्हणणे आहे.
नुकसान भरपाई वाढवावी
सध्या रु. 4 प्रति. चौ. मी. प्रमाणे म्हणजे (एक हेक्टर रु. 40,000) अशी भरपाई देण्यात येते. ते प्रमाण खुपच कमी असून वाढवण्याची मागणी होत आहे. प्रति चौ. मी. रु. 6 या दराने भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
सुपारीसह अन्य पिकांनाही धोका
उन्हाची गरज असताना सातत्याने पाऊस कोसळत असल्याने सुपारीसह इतर पिकांनाही धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे सुपारी गळत असल्याची तक्रार काही बागायतदारांनी केली असून कृषी खात्याने त्याची दखल घ्यावी, असे त्यांचे म्हणणे आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरपाई : मुख्यमंत्री
पावसामुळे भातशेतीचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. ‘शेतकरी आधार निधी’ या योजनेतून ती भरपाई देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रति हेक्टर रु. 40000 या प्रमाणे कमाल 4 हेक्टरपर्यंत जास्तीत जास्त 1 लाख 60 हजार पर्यंत भरपाई देण्याची तरतूद योजनेत आहे. डिसेंबर 2025 पर्यंत भरपाई दिली जाणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.