मुख्यमंत्री साहाय्यता निधी सुविधा सुरू ठेवा
महाराष्ट्र एकीकरण समितीची साहाय्यता निधी कक्षाच्या प्रमुखांकडे मागणी
बेळगाव : महाराष्ट्र सरकारने दावा केलेल्या सीमा भागातील 865 गावातील नागरिकांना वैद्यकीय सेवा मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून दिल्या जात होत्या. नवीन मुख्यमंत्र्यांच्या साहाय्यता निधीतून देखील सीमावासियांना वैद्यकीय सेवा मिळाव्यात तसेच ही योजना कायमस्वरुपी सुरू ठेवावी, अशी मागणी सीमावासियांच्यावतीने मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. म. ए. समिती वैद्यकीय समन्वयक आनंद आपटेकर यांनी नुकतीच मुंबई येथे रामेश्वर नाईक यांची भेट घेतली. यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्षातून सीमा भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा दिल्या जात होत्या. त्यावेळचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी बेळगावमधील अनेक रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून दिली. नवीन सरकारकडून देखील अशाच प्रकारे वैद्यकीय मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
वैद्यकीय सेवा पुरवण्याचे नागरिकांना आश्वासन
काही दिवसांपूर्वी म. ए. समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी नाईक यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. सीमाभागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवू असे आश्वासन त्यांनी दिले होते. येत्या काळात नवीन प्रणाली संदर्भात लवकरच माहिती दिली जाईल. तसेच बेळगावमधील अन्य काही रुग्णालयांचा समावेश करण्याबाबत विचार सुरू असल्याचेही नाईक यांनी सांगितले.