For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्यायसंस्थेचा अवमान असहनीय

06:10 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
न्यायसंस्थेचा अवमान असहनीय
Advertisement

एनसीईआरटी पुस्तकावर सरन्यायधीशांची टिप्पणी

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

एनसीईआरटीच्या आठव्या इयत्तेच्या पुस्तकातल्या न्यायव्यवस्थेसंबंधीच्या उल्लेखामुळे भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या पुस्तकात ‘न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचारा’संबंधी काही उल्लेख करण्यात आला आहे. हा न्यायव्यवस्थेवर केलेला तोलून मापून पण हेतुपुरस्सर केलेला हल्ला असून, असा प्रकार सहन केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

आम्ही न्यायव्यवस्थेचा अवमान कदापीही होऊ देणार नाही. अशा प्रकारांना कसा आळा घालायचा, हे आम्हाला माहीत आहे, अशी टिप्पणी करत न्यायालय या प्रकारची स्वत:हून नोंद घेऊन कारवाई करणार आहे. या संबंधात मला अनेकांकडून संदेश आणि दूरध्वनी आलेले आहेत. उच्च न्यायालयांच्या काही न्यायाधीशांनीही हा प्रकार माझ्या दृष्टीस आणून दिला आहे. त्यांनी यासंबंधी चिंता व्यक्त केली असून सर्वोच्च न्यायालय स्वस्थ बसणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रकरण काय आहे...

एनसीईआरटीच्या आठव्या इयत्तेच्या पाठ्यापुस्तकात ‘न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार’ या संबंधीचा एक धडा आहे. या संदर्भात न्यायव्यवस्थेत चालणाऱ्या कथित भ्रष्टाचारासंबंधी काही वाक्ये आहेत. बुधवारी सर्वोच्च न्यायालयात ही बाब ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या दृष्टीस आणून दिली. या पुस्तकात केवळ न्यायव्यवस्थेतील कथित भ्रष्टाचारासंबंधात उल्लेख आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवर, मंत्र्यांच्या पातळीवर किंवा सरकारी अधिकाऱ्यांच्या पातळीवर जो भ्रष्टाचार चालतो, त्यासंबंधी काहीही उल्लेख नाही. केवळ न्यायव्यवस्थेचाच उल्लेख या पुस्तकात असल्याने न्यायव्यवस्थेसंबंधी अपसमज पसरला जाऊ शकतो. असा आरोप करताना न्यायव्यवस्थेला एकाकी पाडण्यात आले आहे, असे वाटते. हा प्रकार चिंताजनक आणि धोकादायक आहे, असा युक्तीवाद या दोन्ही वकीलांनी न्यायालयात केला.

आम्ही प्रचंड अस्वस्थ

शालेय विद्यार्थ्यांच्या मनात न्यायव्यवस्थेविषयी अशा समजुती पसरविण्याच्या या प्रकारामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात अस्वस्थ आहोत. आठवीच्या विद्यार्थ्यांना न्यायव्यवस्थेतील कथित भ्रष्टाचारासंबंधी शिक्षण दिले जात आहे, हे धक्कादायक आहे. आमच्याजवळ या पुस्तकाची प्रतही आहे. यात काहीतरी घोटाळा आहे, असा संशय घेण्यास जागा आहे, असे कपिल सिब्बल यांनी न्यायालयात स्पष्ट केले.

कार्यवाही करणारच

या सर्व बाबी माझ्याही लक्षात आल्या आहेत. आम्ही न्यायव्यवस्थेची अवमानना खपवून घेणार नाही. एका दिवसात या प्रकारासंबंधी कारवाई करण्यात येईल. पाठ्यापुस्तकातील या आशयामुळे न्यायाधीश आणि वकील हे दोन्ही समुदाय अस्वस्थ आहेत. न्यायव्यवस्थेशी संबंधित प्रत्येकाला याची चिंता वाटत आहे. हा प्रकार करणारी व्यक्ती कितीही उच्च पदावर असो, तिच्यावर कारवाई केली जाणार आहे. कायद्यासमोर कोणीही श्रेष्ठ नाही. अशा प्रसंगांमध्ये काय करायचे, ते आम्हाला चांगले माहीत आहे, असे आश्वासन सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी दिले.

Advertisement
Tags :

.