For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर शहराजवळील मलप्रभा नदीचे पात्र दूषित

10:30 AM Feb 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूर शहराजवळील मलप्रभा नदीचे पात्र दूषित
Advertisement

नगरपंचायत-प्रदूषण महामंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष : नदीपात्राची अत्यंत दयनीय अवस्था : प्रदूषण रोखणे अत्यावश्यक

Advertisement

खानापूर : तालुक्याची जीवनदायिनी असलेली आणि पुराणात तसेच अनेक धार्मिक ग्रंथात पापनाशिनी म्हणून उल्लेख असलेली तसेच रेणुका देवीच्या महात्म्यात मलप्रभेचा उल्लेख असल्याने रेणुका (यल्लम्मा) देवीच्या भक्तांचे भावनिक नाते सांगणारी मलप्रभा नदी असल्याने या ठिकाणी आमावस्या आणि पैर्णिमेला यल्लम्मा भक्त पवित्र स्नानासाठी बेळगाव, हल्याळ परिसरातून येतात. मात्र खानापूर शहराच्या सांडपाण्यामुळे नदीने प्रदूषणाचा कळस गाठला आहे. मलप्रभा नदीची खानापूर शहराजवळ अत्यंत दयनिय आणि नालासदृष्य अवस्था झाली असून याकडे नगरपंचायतीचे आणि प्रदूषण महामंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत नगरपंचायतीने तातडीने क्रम घेणे गरजेचे आहे. खानापूरजवळून वाहणाऱ्या मलप्रभा नदीचे प्रदूषण पाहता नदी की गटार, अशी अवस्था या नदीची झाली आहे. खानापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या ब्रिजकम बंधाऱ्यात पाणी अडवण्यात येते. तसेच जळगे येथे साखर कारखान्यासाठी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातील पाणी अडवण्यात येते. या पाण्यात खानापूर शहराचे सांडपाणी मिसळत असल्याने नदीचे पाणी पूर्णपणे दूषित झाले असून नदीतील पाणी गटारीतील पाण्यासारखे काळेकुट्ट झाले आहे. यातच मलप्रभा नदीघाटावर कपडे धुणे, बेळगाव, हल्याळसह इतर परिसरातील लोक अस्थीविसर्जनासाठी खानापुरात येतात. नदीघाटावर अस्थिविसर्जन आणि रक्षाविसर्जन मोठ्याप्रमाणात करण्यात येते. त्यामुळे अडवलेले पाणी दूषित झाले आहे.

सांडपाणी नदीत मिसळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Advertisement

मुळातच यावर्षी पावसाळा अत्यंत कमी झाला असल्याने नदीपात्रात पाणी कमी झाले आहे. त्यामुळे पाणी अधिकच दूषित झाले आहे. हेच पाणी शहराला पुरवण्यात येते. त्यामुळे शहरवासियांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. खानापूर शहरासह सर्व उपनगरांचे सांडपाणी पूर्णपणे नदीत सोडले जाते. त्यामुळे मलप्रभेचे पाणी खानापूर शहरापासून दूषित होण्यास सुरुवात होते. नोव्हेंबरपर्यंत हे पाणी वाहत असल्याने याचा परिणाम जाणवत नाही. मात्र गेल्यावर्षी पाऊस कमी झाल्याने नदीपात्रातील वाहते पाणी डिसेंबर महिन्यातच बंद झाले आहे. त्यामुळे शहराचे सांडपाणी नदीत मिसळत असल्याने हे पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. हेच पाणी जॅकवेलद्वारे खेचून शुद्ध करून शहराला पुरविण्यात येते. खानापूर नगरपंचायतीची पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा फार जुनी आहे. या ठिकाणी पूर्ण क्षमतेने पाणी शुद्ध होत नाही. हेच पाणी शहराला पुरवण्यात येते. तसेच शहरातील हॉटेल व्यावसायिक याच पाण्यावर आपला व्यवसाय चालवतात. त्यामुळे शहरासह खानापुरात आलेल्या नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. याबाबत नगरपंचायतीने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

कूपनलिकांद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करणे आवश्यक

शहराला याच पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होणार आहेत. यासाठी नगरपंचायतीने शहरातील कूपनलिकांचेच पाणी शहराला पुरविण्याची योजना आखणे गरजेचे आहे. सध्या शहरात 150 कूपनलिका आहेत. त्याद्वारे गल्लोगल्ली योग्य नियोजन केल्यास शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ शकतो. यासाठी नगरपंचायतीने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच यावर्षी तरी जून महिन्यापर्यंत शहराचा पाणीपुरवठा योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे.

अन्यथा पुढीलवर्षीही दूषित पाण्याचा धोका

सध्या मलप्रभा नदीचे प्रदूषण पाहता मलप्रभेचे पाणी शहराला पुरवठा करणे तातडीने थांबविणे गरजेचे आहे. यासाठी नगरपंचायतीने योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. खानापूर शहरासाठी सांडपाणी शुद्धीकरण योजनेचे काम संथगतीने सुरू आहे. जर मे महिन्यापर्यंत सांडपाणी शुद्धीकरण योजना पूर्ण झाली नसल्यास पुढीलवर्षीही दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.

सांडपाणी शुद्धीकरण योजनेचे काम संथगतीने

नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे सांडपाणी नियोजन योजना रखडली आहे. सांडपाणी शुद्धीकरण योजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून याबाबत नगरपंचायतीकडून कोणताच पाठपुरावा करण्यात येत नसल्याने कंत्राटदारही आपल्या सवडीनुसार काम करत आहेत. त्यामुळे शहरवासियांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मलप्रभा नदीत मिसळणारे सांडपाण्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीने योग्य क्रम हाती घ्यावा, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.