For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरात दूषित पाण्याचा पुरवठा

11:23 AM Mar 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहरात दूषित पाण्याचा पुरवठा
Advertisement

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर : रोगराईची भीती : शहरवासियांचे हाल थांबविण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : गतवर्षीपेक्षा यंदा पाण्याचे दुर्भीक्ष लवकर जाणवू लागले आहे. शहरातील बहुसंख्य भागांमध्ये आठ-आठ दिवस झाले तरी पाणीपुरवठा होत नाही. शिवाय जेव्हा पाणीपुरवठा होतो. तेव्हा नळाला गढूळ पाणी आलेले पहायला मिळते. त्याचबरोबर शहरातील बहुसंख्य विहिरींचे पाणी ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने दूषित झाले आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शहरातील मंगळवारपेठ, गुरुवारपेठ, बुधवारपेठ, कचेरी गल्ली यासह इतर भागात दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी ड्रेनेजमिश्रीत पाणी येऊ लागले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. आधीच पाणीसंकट गंभीर बनू लागले आहे. त्यातच दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने पाणी प्यावे की नाही? असा प्रश्न पडू लागला आहे. याकडे एलअँडटी लक्ष देणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एलअँडटी कंपनीच्या कारभाराबाबत नाराजी

Advertisement

शहरातील काही भागात दुर्गंधीयुक्त दूषित पाणी सोडले जात असल्याने एलअँडटी कंपनीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. जलवाहिनी किंवा ड्रेनेज वाहिनीची दुरुस्ती असल्यास तातडीने करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. शरीराला अपायकारक पाण्याचा पुरवठा होत असल्याने कावीळ, उलटी, जुलाब यासारख्या आजारांची भीतीही व्यक्त होत आहे. मुबलक पाणी नसले तरी निदान पिण्याचे पाणी तरी शुद्ध मिळावे, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

बहुसंख्य विहिरींमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने दूषित पाण्याचा सामना

दुसरीकडे शहरातील बहुसंख्य विहिरींमध्ये ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. कचेरी गल्ली येथे तर एका बाजूच्या घरांमधील बहुसंख्य विहिरींचे पाणी दूषित झाले आहे आणि दुसरीकडे नळाला आठ-दहा दिवसांनी पाणीपुरवठा होतो. पाणी असूनही ते दूषित झाल्यामुळे त्याचा वापर करता येत नाही आणि नळाचे पाणी पुरत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय टँकरचे पाणी सातत्याने परवडत नाही. त्यामुळे येथील नागरिकांसमोर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दूषित पाण्यामुळे कावीळ, उलटी, जुलाब होण्याची भीती

मंगळवारपेठ येथेही बहुसंख्य विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. दूषित पाण्यामुळे कावीळ, उलटी, जुलाब असे आजार सुरू होण्याची भीती व्यक्त होत आहे. महानगरपालिकेने लवकरात लवकर दूषित विहिरींची स्वच्छता करावी. तसेच जे जलस्रोत आहेत, त्यांचा योग्य उपयोग करून घ्यावा, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.