For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वामी विवेकानंदनगरात दूषित पाणीपुरवठा

12:02 PM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्वामी विवेकानंदनगरात दूषित पाणीपुरवठा
Advertisement

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर : मनपाचे दुर्लक्ष, समस्या दूर करण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : गटारींची सफाई करण्याकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने स्वामी विवेकानंदनगर तिसरा क्रॉस टिळकवाडी येथील नळाच्या पाण्यातून दूषित पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. स्थानिक रहिवाशांनी नगरसेवक, आरोग्य व स्वच्छता निरीक्षकांकडे तक्रार करूनही या गंभीर समस्येकडे मनपाने दुर्लक्ष केले आहे. त्यातच गेल्या 15 दिवसांपासून पाणीपुरवठा स्थगित करण्यात आला असल्याने पाण्यासाठी नागरिकांना इतरत्र भटकण्याची वेळ आली आहे.

महानगरपालिकेकडून सर्व उपनगरातील गटारी आणि नाल्यांच्या सफाईकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने अनेक ठिकाणी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. गटारीतील व नाल्यातील पाणी पावसाळ्यात रस्त्यावरून वाहण्यासह घरातदेखील शिरण्याचे प्रकार घडत आहेत. गटारींची सफाई केली जात असल्याचा केवळ गाजावाजा केला जातो. पण प्रत्यक्षात तशाप्रकारे होताना दिसत नाही. स्वामी विवेकानंदनगर तिसरा

Advertisement

क्रॉस टिळकवाडी येथील गटारी गेल्या अनेक दिवसांपासून तुंबून आहेत. त्यामुळे गटारीच्या सांडपाण्यावर डासांची पैदासही वाढली आहे. सखल भाग असल्याने या ठिकाणी ड्रेनेजलाईनची व्यवस्था नाही. त्यामुळे सेफ्टीक टँकचा वापर केला जातो. गटारीमधील पाणी वाहून जात नसल्याने ते तसेच तुंबून आहे. यासाठी महापालिकेकडून सातत्याने सफाईचे काम हाती घेणे गरजेचे आहे. पण त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जात आहे.

गटारींवरील काँक्रीटमुळे सफाई करताना अडचणी

परिसरातील गटारींवर काँक्रीट घालण्यात आले असल्याने सफाई करताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच गेल्या 15 ते 20 दिवसांपासून नळांना दूषित पाणी येत आहे. याबाबत स्थानिक रहिवाशांनी महानगरपालिकेकडे तक्रार केल्यानंतर परिसरातील दोन ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतरही दूषित पाणीपुरवठा सुरूच आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केवळ गटारींची सफाई करण्याकडे दुर्लक्ष केल्यानेच हा प्रश्न निर्माण झाला असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांतून केली जात आहे. याबाबत नगरसेवक व महापालिकेला संपर्क साधून तक्रार केली असता कोठे फॉल्ट आहे त्याचा शोध घेतला जात आहे, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

गटारींची सफाई करून स्वच्छ पाणीपुरवठा करा

काही दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात न आल्याने पाण्याअभावी नागरिकांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे सध्या टँकरद्वारे पाणी घेण्याची वेळ आली असून, महानगरपालिकेने याकडे लक्ष घालून तातडीने गटारींची सफाई करून स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली जात आहे.

Advertisement
Tags :

.