दूषित नदी ते समाज
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर केलेले भाषण महाराष्ट्रातील मराठी समाज, सर्व पक्षांचे मराठी नेते यांच्यापासून देशभरातील हिंदुत्ववादी ते पर्यावरणवादी नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरले आहे. विशेषत: राज्यकर्त्यांना या भाषणाचा जोराचा करंट लागणार आहे. महाराष्ट्रात प्रबोधनाचा विचार मांडण्याची धिटाई कोणीतरी नेत्याने राजकीय फायद्या तोट्याचा विचार न करता सातत्याने केली पाहिजे. ती जबाबदारी राज ठाकरे पेलत आहेत हे महत्त्वाचे आहे. सर्वच राजकीय प्रश्नावर या किंवा त्या बाजूने स्पष्ट मत मांडले पाहिजे असा आग्रह दोन बाजूला विभागलेल्या राजकीय शक्तींकडून होत असताना, स्वत:चा विचार मांडण्याची आणि आपणास योग्य वाटेल त्याच वाटेने प्रसंगी बाजू बदलत बदलत पण स्वतंत्र वाटचाल करण्याची धमक महाराष्ट्रातील उर्वरित किमान दोन राजकीय पक्षांमध्ये आहे. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर आहेत. या दोन्ही नेत्यांना मनाला पटेल त्या दिशेने वाटचाल करण्याची असलेली सवय अनेकदा लोकांना संभ्रमात पाडत असते. मात्र निर्णायक क्षणी हे नेते जे बोलतील ते बिनतोड असते हेही निश्चित. परिणामी वेळोवेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हिंदू मुस्लिमांमध्ये मुद्दामहून निर्माण केला जात असलेला तणाव किंवा दलीत सवर्ण मतभेद असो किंवा सध्या जातीच्या प्रश्नावर विभाजित झालेला मराठा-ओबीसी किंवा मराठा-ब्राह्मण समाज असो. याबाबतीत ठामपणाने संपूर्ण समाजाच्या डोळ्यात अंजन घालायला महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष कचरत असताना राज यांनी पाडव्याच्या मेळाव्यात जी भूमिका मांडली तिचे स्वागत केले पाहिजे. इतिहासातील कारणे काढून आज समाजात तेढ निर्माण करण्याने हाती काहीच लागणार नाही. उलट महाराष्ट्राची अधोगती ठरलेली आहे. अशा निर्णायक वेळी तर आपल्या राजकीय विचारांपेक्षाही महाराष्ट्र धर्माचा विचार करणे आवश्यक आहे. आपल्याला पटतो त्या राजकीय विचाराचा नेता आणि त्याची नेतावळ जे काही करत आहे ते चांगलेच मानायचे हे दिवस नाहीत. तसेही या राज्यातील जे मूलभूत जातीय वाद-विवाद आहेत ते आताच उफाळून कायमचे मार्गी लागतील असेही नाही. त्यामुळे आजच्या स्थितीत ते उकरून त्यावर उद घालण्यात काहीही अर्थ नाही हे मान्य करण्याची ही वेळ आहे. चर्वितचर्वण, कुजबुज, धुसफूस फारच झाल्याने राज्यात एकीकडे माथे भडकलेले कोणीतरी मशिदीत स्फोट करायला उठले आहेत, कोणी दुसऱ्या जातीच्या व्यक्तींवर हल्ले करायला आणि कोणी जीव घ्यायला तयार आहेत. बहुतांश जण आपलेच श्रेष्ठत्व सिद्ध करायला झटत आहेत. त्यासाठी दुसरी जात एकाकी पाडण्याचे कुटिल डाव रचत आहेत. याचा राजकीय लाभ होतो. पण संपूर्ण राज्यातील प्रत्येक माणूस आणि कुटुंब आपापल्या जातीत विभागला जाऊन दुसऱ्याचा द्वेष करण्यास टपून बसलेला आणि संधी मिळेल त्यावेळी उठाव करायला टपला आहे. या घातक स्थितीला जाणुनच नेत्यांनी बोलले पाहिजे. गंगा नदीच्या स्वच्छतेपासून ते चित्रपट बघणारे हिंदू खरे हिंदू नसतात अशा मुद्यांपर्यंत राज ठाकरेंनी भाष्य केले. विद्युत शववाहिन्या, ईव्हीएम, नद्यांच्या स्वच्छतेकडे राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष हे अत्यंत महत्त्वाचे आणि इतर नेत्यांच्या भाषणात केंद्रस्थानी न राहणारे मुद्दे राज ठाकरे यांच्या भाषणात होते. औरंगजेबाची कबर आणि महाराष्ट्राचा इतिहास याबाबत त्यांनी जे भाष्य केले ते महाराष्ट्रातील सर्व नेत्यांचे एकमुखी भाष्य असले पाहिजे. पण, राजकीय नफा डोळ्यासमोर ठेऊन जो तो हा मुद्दा चघळत आहे. आपण कुंभमेळ्यावेळी आणलेले पाणी का स्वीकारले नाही याचा आणि यातून कुंभमेळा, गंगा नदी, हिंदू धर्म यांचा अपमान केल्याच्या आरोपाचा समाचार घेण्याची आयती संधी काही मंडळींनी राज ठाकरेंना दिली होती. शिवाजी पार्क या हक्काच्या मैदानात त्यांनी तो फुलटॉस सीमेपार केला नसता तरंच नवल. त्यांनी गंगा प्रदूषणाचे, त्यात महंतांचे मृतदेह सोडून दिल्याचे, अर्धवट जळलेले मृतदेह गंगेत लोटून देण्याचे आणि काठाला कसे कळकट, रोगट वातावरण निर्माण झाले आहे आणि त्यातून विषारी, दूषित पाणी कसे वाहते याचे नमुने दाखवले. मुंबईतील एकमेव वाचलेल्या मिठी नदीची आजची अवस्था काय आहे त्याचा अगदी ताजा व्हिडिओ लोकांच्यासमोर ठेवला. याचा परिणाम लोकांच्या मनावर चांगलाच होत असतो. मात्र आपले राजकीय नेते अशा मूलभूत प्रश्नांचा विसर पडण्यासाठी याहून अधिक चर्चेचे मुद्यांना हवा देऊन इतके चर्चेत ठेवतात की त्यातून अशा मूलभूत प्रश्नावर विचार करायला जनतेला वेळच मिळत नाही. पाडव्याच्या शांत सायंकाळी राज ठाकरे यांनी हा मुद्दा उचलला आहे तो जनतेनेच आपापल्या भागातील नदीच्या बाबतीत कायम चर्चेत ठेऊन जाब विचारण्याची गरज आहे. देशभरात 311 नदीपट्टे हे प्रदूषित असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 55 नद्यांचा समावेश आहे. या सर्व 55 महत्त्वाच्या नद्या आहेत. सावित्री नदीची सर्वात दुर्दशा झाली असली तरी पंढरपुरात चंद्रभागेच्या झालेल्या दुर्दशेचा महाराष्ट्रातील प्रत्येक वारकरी अनुभव घेत असतो. या एका नदीच्या प्रदूषणावरून महाराष्ट्रात जन चळवळ उभी राहू शकते. नमामि चंद्रभागा प्रकल्पाचे काय झाले याचा महाराष्ट्रातील प्रत्येक परिवार जाब विचारू शकतो. मात्र आपण या विरोधात बोलले पाहिजे ही जनतेतील भावना लोप पावली आहे आणि नको त्या जातीय प्रश्नावर महाराष्ट्र धूपतो आहे. त्या जनतेच्या मनावर फुंकर घालण्याचे काम करण्याची जी गरज आहे. त्यादृष्टीने राज ठाकरे यांनी एक पाऊल उचलले आहे. याशिवाय विद्युत दाहिनी, मशिदींवरील भोंगे, लाडकी बहिण ते रोजगाराचे प्रश्न, चित्रपटाच्या निमित्ताने जनतेच्या भडकावल्या जात असलेल्या भावना आणि महाराष्ट्राची प्रगतीसाठी सर्व जाती धर्माची एकजूट असली तरी या सर्वच मुद्यांवर जे राज ठाकरे बोलले ते इतर नेते बोलू शकत नाहीत का? लोकांनी आपापल्या नेत्यांना याचा जाब विचारला पाहिजे आणि यंत्रणांनी अशी फूट पडणाऱ्यांवर कायद्याप्रमाणे बडगा उगारला पाहिजे.