For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गायींची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर सुवर्ण विधानसौधजवळ हल्ला

10:13 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
गायींची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर सुवर्ण विधानसौधजवळ हल्ला
Advertisement

चालकासह दोघे जखमी

Advertisement

बेळगाव : कंटेनरमधून गायींची वाहतूक करणाऱ्या दोघा जणांना संतप्त जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना हलगा येथील सुवर्ण विधानसौधजवळ रविवारी रात्री घडली. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. मारहाणीत चालकासह दोघे जण जखमी झाले आहेत. मारहाणीतील जखमी केरळमधील राहणारे असून त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले आहे. बेकायदा गो वाहतुकीच्या संशयावरून संतप्त जमावाने कंटेनरवरही दगडफेक केली असून जमावाला आवरणे पोलिसांना कठीण जात होते. घटनेची माहिती समजताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश हे घटनास्थळी दाखल झाले. उमर टी. के. (वय 46) रा. कासरगोड, केरळ, सुनीलकुमार नायर (वय 38) रा. पड्या कोरोथमोला अशी जखमींची नावे आहेत. रविवारी रात्री 7.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक गुरुशांत दाशाळ व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. गायी घेऊन हा कंटेनर केरळकडे जात होता. त्यावेळी हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांना संशय येऊन त्यांनी सुवर्ण विधानसौधजवळ कंटेनर अडविला. चालक व कार्यकर्त्यांत वादावादीचा प्रसंग घडला. वादावादीनंतर कंटेनरचालक व क्लीनरला बाहेर काढून त्यांना बेदम मारहाण करण्यात आले. याचवेळी या मार्गावरून जाणारे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हेही घटनास्थळी थांबले. पोलीस उपायुक्तांकडून त्यांनी घटनेसंबंधी माहिती घेतली. सुमारे 500 हून अधिक कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाले होते. सिव्हिल हॉस्पिटल परिसरातही रात्री पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. त्या कंटेनरमध्ये सुमारे 20 गायी व म्हशी असल्याची माहिती मिळाली असून संपूर्ण चौकशीअंतीच यासंबंधी अधिक माहिती मिळणार आहे, असे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
Tags :

.