चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर उलटला
कराठ :
सफरचंद घेऊन मुंबईवरून बेंगलोरला निघालेल्या चालकाचा कंटेनरवरील ताबा अचानक सुटला. ताबा सुटल्याने कंटेनर मालखेड (ता. कराड) हद्दीत महामार्गावरच उलटला. कंटेनरच्या आजूबाजूला इतर वाहन नसल्याने अनर्थ टळला. अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून कंटेनरचेही मोठे नुकसान झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सफरचंद घेऊन कंटेनर बेंगलोरला निघाला होता. भरधाव वेगात असलेला कंटेनर कराड तालुक्याच्या हद्दीत मालखेड येथे आला. यावेळी कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा अचानक सुटला. त्यामुळे कंटेनर महामार्गावरच उलटला. सुदैवाने कंटेनरच्या मागे, पुढे किंवा आजूबाजूला कोणतेही इतर वाहन नव्हते.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, अपघात विभागाचे प्रशांत जाधव, धनचंद्र पाटील यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. कंटेनर उलटल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी कंटेनर बाजूला करण्यासाठी प्रयत्न केले. अपघाताची नोंद कराड ग्रामीण पोलिसांत झाली आहे